मुंबई : मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आचासंहितेमुळे चाचपडत असतानाच भाजपनं नालेसफाई पाहणीचे दौरे सुरु केले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांताक्रूझ पश्चिम भागातील नाल्यांची पाहणी करत मुंबई महापालिका प्रशासनाला लक्ष्य केलं. नालेसफाईबाबत मुंबई महापालिकेचा आकडा आणि वास्तव यात तफावत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.


आशिष शेलार यांनी जो नालेसफाई दौरा केला त्यामध्ये मित्रपक्ष शिवसेना नव्हती. यामध्ये कुठलंही राजकारण नसून केवळ प्रशासनावर वचक निर्माण होऊन कामे पूर्ण होण्यासाठीच हा दौरा केल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिलं.



प्रशासन नालेसफाईचे पूर्ण केल्याचे केवळ आकडे फेकत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आचारसंहिता शिथील करण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला. शिवसेना त्यांच्या पातऴीवर दौरे करेल, आम्ही आमच्या पातळीवर दौरे करत असल्याचे शेलारांनी सांगितले.


नालेसफाईच्या पाहणीवर भाष्य करताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नालेसफाईची जी आकडेवारी दिली आहे, ती प्रत्यक्षात झालेली नाही. मुंबईत जास्तीत जास्त 30 टक्के नालेसफाई झाली असल्याचं आमच्या पाहणीतून समोर आलं आहे. आचारसंहिता असल्याने प्रशासकीय अधिकारी व्यस्त आहेत, त्यामुळे याचा फायदा कंत्राटदार घेत आहेत, याचा पाठपुरावा आम्ही करत असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.