मुंबई : हेल्मेट घातले नाही म्हणून डोक्यावर काठीनं मारणं 'त्या' वाहतूक पोलिसाला महागात पडण्याची शक्यता आहे. कारण याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देताना संबंधित पोलिसावर चौकशी करू कारवाई करु अशी हमी राज्य सरकारनं हायकोर्टात दिली आहे.


खेरवाडी जंक्शनवर जानेवारी महिन्यात ही घटना घडली होती. नाकाबंदीत एका पोलिसाने हेल्मेट घातलं नाही म्हणून बाईकस्वाराच्या डोक्‍यावर काठी मारल्यामुळे बारावीचा विद्यार्थी असलेल्या आपल्या मुलाची प्रकृती बिघडल्याचा आरोप करत वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र याबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हमी राज्य सरकारच्यावतीनं देण्यात आल्यानं न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठीनं ही याचिका निकाली काढली.


चंद्रकांत करंबळे यांनी आपला मुलगा सतेज याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीविरोधात न्यायालयात याचिका केली होती. याचिकेतील दाव्यानुसार बारावीचा विद्यार्थी असलेल्या सतेजला 7 जानेवारी 2019 रोजी वाहतूक पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खेरवाडी जंक्शनजवळ अडवले होते.


मात्र त्याची चौकशी करत असताना पोलिसांनी त्याच्या डोक्‍यावर हेल्मेट घातली नाही म्हणून काठीने जोरदार फटके मारले. या मारहाणीमुळे सतेज जागीच बेशुद्ध झाला. पोलिसांनीच नंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जिथे काही दिवस त्याची प्रकृती गंभीर झाली होती.


सीटी स्कॅन केले असता सतेजला डोक्यामध्ये गंभीर इजा झाल्याचं उघड झाले होते. या घटनेनंतर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी वडिलांनी वारंवार पोलीस विभागाकडे केली होती. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे त्यांनी अखेर त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.