मुंबई : भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिकेच्या एका अभियंत्याला अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. साटम यांनी अभियंत्यांना शिवीगाळ केल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आमदार अमित साटम यांनी पैसे उकळण्यासाठी धमकी दिल्याचा दावाही अभियंत्यांनी केला आहे. के-पश्चिम वॉर्डमधील राठोड (कनिष्ठ अभियंता) आणि पवार (सहाय्यक अभियंता) यांना साटम यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

अमित साटम हे भाजपकडून मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील आमदार आहेत.

'एबीपी माझा'च्या हाती अमित साटम आणि अभियंत्यांमधील फोन संभाषणाची एक क्लीप हाती लागली आहे. यात आमदार साटम यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचा दावा करण्यात येत आहे.

अमित साटमांनी आरोप फेटाळला

फोन संभाषणातील सुरुवातीचा आवाज आपला असला, तरी शिवीगाळ ऐकू येत असलेला संभाषणाचा भाग एडिट किंवा मॉर्फ करुन व्हायरल केल्याचा दावा अमित साटम यांनी केला आहे.

पवार यांनी के-वेस्ट वॉर्ड सोडून दहा महिने झाले, म्हणजे हे संभाषण किमान एक वर्ष जुनं असावं. असं कोणतंही संभाषण झाल्याचं आपल्या आठवणीत नाही, असा दावाही साटम यांनी केला.

अभियंते पवार यांच्याशी आपले चांगले संबंध होते, त्यामुळे त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण विधानसभेत 50 हजार कोटींचा बिल्डिंग स्कॅम बाहेर काढला होता. त्याबाबत चौकशी सुरु असून लोकायुक्तांकडे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे निर्णय होण्याआधी माझी बदनामी करुन दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असं साटम म्हणाले.

ऐका सोशल मीडियावर व्हायरल झालेली कथित ऑडिओ क्लीप :