मुंबई : जिल्हा परिषद निवडणुकीपाठोपाठ राज्यातील विविध महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही भाजपला धक्का बसला आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव महापालिकेतील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. तर नागपूर आणि पनवेलच्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपचा विजय झाला आहे. याशिवाय तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणुकीतही भाजपला जोरदार झटका बसला आहे.
मुंबई महापालिका पोटनिवडणूक
मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक 141 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेचे उमेदवार विठ्ठल लोकरे 4427 मतं मिळवून विजयी झाले. प्रभाग क्रमांक 141 चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेत प्रवेश करत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता आणि शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर इथे पोटनिवडणूक झाली. महाविकास आघाडी झाल्यानंतर मुंबईमधील ही पहिलीच निवडणूक होत असल्याने याकडे सर्वांचे लागलं होतं. भाजपचे दिनेश पांचाळ आणि शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांच्यात थेट लढत असल्याने ही लढाई दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. यात भाजपचे दिनेश पांचाळ यांना 3042 तर शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांना 4427 मतं मिळवली आहेत. एकूण 1385 मतांनी शिवसेनेने ही पोटनिवडणूक जिंकली आहे.
मालेगाव महापालिका पोटनिवडणूक
मालेगाव महापालिका पोटनिवडणुकीत महाआघाडीचा विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 12 ड मधून जनता दल-महागठबंधन आघाडीचे मुस्तकीन डिग्नेटिक 7992 मतांनी विजयी झाले आहेत. जनता दलाचे शहर अध्यक्ष बुलंद इकबाल निहाल अहमद यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. मुस्तकीन हे जनता दलाच्या नगरसेविका शान निहाल अहमद यांचे पती आहेत.
नाशिक महापालिका पोटनिवडणूक
नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. सातपूर प्रभाग 26 अ मधून महाविकास आघडीचे मधुकर जाधव (शिवसेना) विजयी झाले आहेत. तर मनसेचे दिलीप दातीर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर नाशिकरोड प्रभाग 22 मधून महाविकास आघडीचे जगदीश पवार (राष्ट्रवादी) विजयी झाले आहेत.
पनवेल महापालिका पोटनिवडणूक
पनवेल महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. भाजपच्या रुचिता लोंढे यांनी शिवसेनेच्या स्वप्निल कुरघोडे यांचा पराभव केला. रुचिता लोंढे यांनी 3 हजार 200 मतांनी विजय मिळवला आहे.
नागपूर महापालिका पोटनिवडणूक
नागपूर महापालिका पोटनिवडणुकीतही भाजपने विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक 12 ड मध्ये भाजपचे विक्रम ग्वालबंशी यांचा 9 हजार 336 मतांनी विजय झाला. तर काँग्रेसचे पंकज शुक्ला हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
गडचांदूर नगरपरिषद निवडणूक
चंद्रपुरात गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता टेकाम यांनी भाजप उमेदवार रंजना मडावी यांचा 1500 मतांनी पराभव केला, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती. नगरसेवक निकालात 17 जागांपैकी काँग्रेस 5, राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना 5, भाजप 2, शेतकरी संघटना 1 अशी स्थिती आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर चंद्रपुरातील ही निवडणूक झाली होती. मात्र यात शिवसेनेने स्वतंत्रपणे लढवून देखील आपल्या जागांमध्ये वाढ केली आहे. या निकालानंतर गडचांदूर शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान माजी मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असताना भाजपच्या पारड्यात मात्र केवळ 2 जागा आल्याने भाजप तंबूत निराशा आहे.
तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणूक
पुणे जिल्ह्यात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या आमदार सुनील शेळकेंनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्याच पदासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत, आमदारांच्या काकी संगीता शेळके नशीब अजमावत होत्या. अपक्ष उभं करुन महाविकासआघाडीने त्यांना पाठिंबा दर्शवला होता. संगीता यांनी भाजपच्या कृष्णा म्हाळसकर यांचा 795 मतांनी पराभव केला. म्हाळसकर हे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंचे समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडेंचा पराभव करुन सुनील शेळकेंनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. याची पुनरावृत्ती तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीतही झाली.