मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाची तयारी सुरु केल्याचे दिसून येते. भाजपच्या निवडणूक समितीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार केली आहे. निवडणूक समितीची तीन दिवस 20 तास बैठक घेऊन भाजपने 512 नावांची वॉर्ड निहाय चर्चा करुन यादी तयार केली आहे.


अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार भाजपच्या निवडणूक समितीने मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे एकूण 2 हजार 500 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्याला पहिली चाळण लावून 1 हजार 769 इच्छुकांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर त्यातही नावांचा विचार करुन निवडणूक समितीने अखेर 512 नावांची यादी तयार केली.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या निवडणुक समितीत 29 सदस्यांचा समावेश होता. या समितीने सलग तीन दिवस 20 तास मॅरेथॉन व सखोल चर्चा केली. काल रात्री 3 वाजता समितीची बैठक संपली.

प्रत्येक वॉर्डासाठी 2 ते 3 नावे या प्रमाणे ही यादी तयार असून, युतीचा निर्णय झाल्यानंतर अंतिम यादी तयार करुन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवण्यात येणार आहे.