मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) समन्वय नसल्याने अनेकदा अडचणी येतायत, त्यामुळे वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालत वादाला पूर्णविराम द्यावा. अन्यथा उल्हासनगरमधील गोळीबार (Ulhasnagar Firing) सारख्या घटना घडत असल्याचं म्हणत भाजपचे कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार (Narendra Pawar) यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. सोबतच गणपत गायकवाड प्रकरणात (Ganpat Gaikwad Case) वरिष्ठांच्या पुढाकाराने सलोख होऊन हा वाद मिटेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. 


जमिनीच्या वादातून आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भाजपच्या कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ही घटना गंभीर असल्याचे म्हटले आहे. मात्र, ही घटना घडण्या इतका मानसिक तणाव त्यांच्यावर का आला?, हा चिंतनाचा विषय असून, याचाही विचार व्हायला हवा. घडलेल्या घटनेचं मी समर्थन करणार नाही, असेही पवार म्हणाले. 


कार्यकर्त्यांमधील वादांना पूर्णविराम द्यावा...


पुढे बोलतांना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटले की, “वास्तविक महायुतीमध्ये समन्वय नसल्याने अनेकदा अडचणी येत असून, त्याचाच हा एक भाग आहे. भाजप व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानी तत्काळ यामध्ये लक्ष घालून कार्यकर्त्यांमधील वितुष्ट संपवून त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करावेत. घडलेली घटना गंभीर असून, भविष्यातील अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नेत्यानी यात तातडीने लक्ष घालावे. कार्यकर्त्यांमधील वादाना पूर्णविराम द्यावा अशी कार्यकर्त्यंची मागणी असल्याचे देखील नरेंद्र पवार यांनी सांगितले.


कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता...


गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केले असून, यानंतरही सलोखा होईल असा विश्वास नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. नेतृत्वावर आम्हाला आणि आमच्यावर नेतृत्वाला विश्वास असल्याने दोन्ही पक्षाचे वरिष्ठ समजून घेतील. शहराच्या भविष्यातील विकासासाठी दोन्ही पक्षाचे नेते वैर भावना संपवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर, भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यामधील वादाविरोधात यापूर्वी देखील अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. सर्व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे, कारण दोन्ही पक्षात समन्वय नाही. पण, आता या घटनेनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्याकडे वाद संपविण्याची आपण मागणी केली असून, त्यावर नक्कीच विचार होईल असा विश्वास सुद्धा नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या: 


आधी राजकीय वार- पलटवार, मग थेट गोळीबार, अन् आता सुरू झालाय 'सोशल वॉर'; गणपत गायकवाड प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?