Kirit Somaiya : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एका फोटोवरून वाद सुरु झाला आहे. किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स तपासल्याचा कथित फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी सोमय्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 


काँग्रेस नेते सचिन सावंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सोमय्यांवर टीका केली आहे. तर किरीट सोमय्या यांनी मात्र त्यांच्या कृतीचं समर्थन केलंय. माहिती अधिकार अंतर्गत आपण माहिती मागवली होती आणि त्यासाठी आपण तिथं गेलो होतो, असं सोमय्या यांनी म्हटले आहे.


काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की,  भाजप नेत्यांची मानसिक स्थिती हलाखीची झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी आहे. किरिट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सावंत यांनी म्हटले. सोमय्या यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. 






महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वीच आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील छाबय्या विहंग या इमारतीला ठोठावण्यात आलेला तब्बल ३ कोटींचा दंड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपच्या नेत्यांनी या निर्णयावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. राज्य सरकारने नियम डावलून प्रताप सरनाईक यांच्या इमारतीचा दंड माफ केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.