Mumbai School Reopen : मुंबईत काल म्हणजेच, सोमवारपासून पूर्व प्राथमिक ते बारावी इयत्तेपर्यंतच्या वर्गांसाठी शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यापैकी पूर्व प्राथमिक म्हणजे, शिशुवर्गासाठी दोन वर्षांनी शाळा भरल्यामुळं त्या शाळांमध्ये किलबिलाट पसरला होता. ही बच्चेकंपनी पहिल्यांदाच शाळेत आली होती. त्यामुळं त्यांचं खास स्वागत करण्यात आलं. शाळेचा अनुभव अगदीच नवा असल्यामुळं चिमुरड्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हुरहूरही दिसत होती. दरम्यान, पहिल्याच दिवशी 90 टक्क्यांपेक्षा अधिक शाळा सुरु झाल्या आहेत. तर 60 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 


मुंबईतील शाळा सोमवारी सुरु झाल्या. मुंबईत 90 टक्क्यांपेक्षा अधिक शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये  90 टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षकांनी तर 60% विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. कोरोना नियमांचं पालन करत वर्ग भरवण्यात आले आहेत. 


मुंबईतील शाळा 24 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पालिका शिक्षण विभागाकडून शहरातील सर्व माध्यम, व्यवस्थापन, मंडळाच्या शाळांना तशा सूचनाही दिल्या. त्याप्रमाणे मुंबईतील 90 टक्क्यांहून अधिक शाळांनी वर्ग सुरु करून प्रतिसादही दिला आहे. शाळांमध्ये शिक्षकांची एकूण उपस्थिती ही जवळपास 91 टक्के तर पालिका शाळांमधील शिक्षकांची उपस्थिती ही जवळपास 97 टक्के होती. 


मुंबईतील शाळांसंदर्भातील आकडेवारी : 


मुंबईतील एकूण शाळा : 1774 
24 जानेवारीपासून सुरु झालेल्या शाळा : 1731 
मुंबईतील एकूण विद्यार्थी संख्या : 982860 त्यापैकी, उपस्थित विद्यार्थी संख्या : 526452 
मुंबई एकूण शिक्षक संख्या : 34486 त्यापैकी, उपस्थित शिक्षक संख्या : 31353 


दरम्यान, ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या राज्यातील शाळा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली. मात्र ठराविक शहरं सोडली तर जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु न करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, नंदुरबारमध्ये पहिली ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. तर धुळ्यात नववी ते बारावी, बीडमध्ये अकरावी ते बारावी, जालन्यात आठवी ते बारावी, नांदेडमध्ये नववी ते बारावीचे असे टप्प्याटप्प्यानं वर्ग सुरू होतील. मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसल्यानं पालकवर्ग काय भूमिका घेतो, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान यावेळी पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु झाले आहेत. त्यामुळं अनेक चिमुकले पहिल्यांदाच शाळेच्या बाकावर बसले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai School Reopen : पहिल्याच दिवशी मुंबईतील 90 टक्के पेक्षा अधिक शाळा सुरू



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI