मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते हैदर आझम (Haidar Azam) यांची पत्नी रेश्मा खानला (Reshma Khan) मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai Highcourt) मंगळवारी अटकेपासून दिलासा दिला आहे. तसेच अटक झाल्यास रेश्मा यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रेश्मा खाननं त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. रेश्मा या एक बांग्लादेशी नागरिक असून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा आरोप तिच्या विरोधात आहे.

 

न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांनी मंगळवारी रेश्माच्या याचिकेवर सुनावणी घेत रेश्माला अटकेपासून दिलासा दिला आहे. त्याचवेळी रेश्माला याप्रकरणी सुरू असलेल्या तपास कार्यात सहकार्य करण्याचे तसेच तपास अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलावल्यावर हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. रेश्माचे पारपत्र सकृतदर्शनी बनावट असल्याचं दिसून येत असून तिला पोलीस कोठडीची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला होता. परंतु राजकीय सूडाने आणि आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी आपल्याविरोधात ही तक्रार केल्याचा दावा करून रेश्मानं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, आपली पत्नी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर गावातील रहिवासी आहे, असा दावा हैदर आझम यांनी रेश्मावरील या आरोपांनंतर केला होता.

 

हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha