मुंबई -  जाहीरपणे शिवीगाळ करत 'रोड रोमियो' सारखी भाषा करणाऱ्या सर्वज्ञानी संजय राऊतांवर (sanjay Raut) दिल्लीत गुन्हा दाखल झाला. पण अद्याप राज्य सरकारनं ना दखल घेतली ना कारवाई करण्याची हिम्मत दाखवली, असे वक्तव्य  भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी केलं आहे. महाविकास आघाडी सरकरानं या सर्वज्ञानींना रोड रोमियोंचे ब्रॅंण्ड ॲम्बेसेडर म्हणून तरी जाहीर करावं असा टोला देखील चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावलाय. आता चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडी प्रतिउत्तर देणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


नेमकं प्रकरण काय?


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना खुर्ची देतानाच्या राऊतांच्या फोटोवर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती.  त्या टिकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी एका आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. मात्र, त्या शब्दाचा अर्थ मूर्ख असा होत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. मात्र, या शब्दप्रयोगावरुनच त्यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवार यांना संजय राऊत खुर्ची देतानाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पितृतुल्य नेत्याला खुर्ची देण्यात वावगं ते काय? पवारांच्या जागी वाजपेयी किंवा अडवाणी जरी असते, तरी मी त्यांना खुर्ची दिली असती,  असं सांगतानाच सगळ्याच गोष्टीत राजकारण आणू नका, असे राऊत म्हणाले होते.  प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. हे या ***** लोकांना कळत नाही. ही ***** बंद करा. अशानं तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही. हा तुमच्या डोक्यातील कचरा आहे. हा कचरा जर तुम्ही साफ केला नाही तर एखाद्या डंपिंग ग्राऊंडमध्ये लोकं तुम्हाला गाडून टाकतील. हे मी तुम्हाला ऑनरेकॉर्ड सांगतोय.  मोठ्या लोकांना बसायला खुर्ची देण्यानं जर तुम्हाला त्रास होत असेल तर  तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. वडिलधाऱ्यांचा आदर ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे राऊत म्हणाले. परंतु, आपल्या भावना व्यक्त करताना संजय राऊत यांनी  अपशब्द वारल्याची तक्रार भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज यांनी केली आहे.


दिल्लीत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर, त्यांनी माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला असल्याचं म्हटलंय.  मी दिल्लीतच बसलोय. अधिवेशन संपल्यानंतरही दिल्लीतच राहिल. येताय तर या. मी तुमची वाट पाहतोय, अशा शब्दात संजय राऊत यांनी पोलिसांनाचं आव्हान दिलं आहे.मी काही चुकीचं बोललो नाही. माझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नसल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. मात्र, आता चित्रा वाघ यांनी आता संजय राऊत यांना रोड रोमियोंचे ब्रॅंण्ड ॲम्बेसेडर म्हणून जाहीर करावं  असं वक्तव्य केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.