Amit Shah Mumbai Tour : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईत येणार आहेत. मागील काही वर्षांपासून अमित शाह हे मुंबईतील बाप्पांचे दर्शन घेत आहेत. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाह यांनी हा दौरा टाळला होता. अमित शाह हे आपल्या मुंबई दौऱ्यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार आहेत. शिवसेनेत झालेले अभूतपूर्व बंड आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. 


अमित शाह हे  2017 मध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हापासून अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. मुंबई दौऱ्यात वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळादेखील शाह यांनी याआधी भेट दिली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये कोविडमुळे अमित शाह यांना लालबागच्या राजाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येणार आहेत. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. 


मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीति?


शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. मागील 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतली होती. शिवसेना आणि भाजपमध्ये अवघ्या काही जागांचा फरक होता. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक आणखी सोप्पी करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत अमित शाह हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि भाजप ही निवडणूक एकत्रपणे लढवणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार की राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. मुंबई काँग्रेसमधील एक मोठा गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे. 


मुंबईतील किती आमदार शिंदे गटात?


मुंबईतील प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर हे आमदार शिंदे गटात सामिल झाले आहेत. त्यांच्यासोबत काही नगरसेवकही आहेत. मात्र, मु्ंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही नगरसेवक शिंदे गटात सामिल होण्याची शक्यता आहे. या आमदारांच्या प्रभावाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. तर, दुसऱ्या बाजूला सध्या तरी मुंबईतील स्थानिक शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची जोरदार रणनीती शाह यांच्या दौऱ्यात आखली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.