मुंबई : "भारतीय जनता पक्ष निवडणूक लढण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे करतो. तसेच हा पक्ष हिंदुंसाठी असल्याच्या वल्गना करत असतो. पण भाजपचं हिंदुत्व आणि त्यांचा राम दोन्ही गोष्टी निवडणुकीपुरत्या मर्यादित आहेत", असे विधान नरेंद्र मोदींचे एके काळचे जवळचे मित्र आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात तोगडीया सहभागी झाले होते. यावेळी तोगडीया यांनी भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली.

तोगडिया म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाने त्यातही प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या येथील राम मंदिर, इंदौरची मशीद, शेतकरी आत्महत्या, देशाच्या विकासाचे आश्वासन यांचा केवळ निवडणुकांसाठी वापर केला आहे. भाजपला यापैकी कोणत्याही गोष्टीशी काहीही देणेघेणे नाही."

तोगडिया म्हणाले की, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर जेव्हा तुरुंगात होती, तेव्हा भाजपचे नेते तिच्याविषयी काहीच बोलत नव्हते. मी जर तिच्या बाजूने काही बोललो तर मला नेहमी रोखायचे. परंतु त्याच भाजपच्या नेत्यांनी आता साध्वीला मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. भाजपसाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरदेखील निवडणुकीचा मुद्दा आहे. भाजपला साध्वीसाठी कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाही. त्यांना केवळ तिचा निवडणुकीसाठी वापर करायचा आहे.

तोगडिया म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष देशातील युवकांच्या रोजगारावरुन राजकारण करत आहे. भाजप सत्तेत आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे. गेल्या वर्षभरात देशातील 1 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. त्याअगोदरच्या वर्षातही एक कोटीहून अधिक लोकांनी रोजगार गमावले. भाजपमुळेच देशावर ही परिस्थिती ओढवली आहे."