भिवंडी : प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीच्या मंदिरावरील दरोड्याची घटना ताजी असतानाच आता अजून एका दरोड्याने भिवंडीत खळबळ उडाली आहे. भिवंडीतील बांधकाम साहित्य पुरवठादाराच्या घरी 43 लाख रुपयांची घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लुटारुंनी घरातून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली आहे. काल (शुक्रवार, 11 मे) रात्री नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यावरुन घरी परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार व्यावसायिकाच्या निदर्शनास आला.
विश्वास पाटील हे व्यावसायिक भिवंडीतील पोगाव येथे कुटुंबासह राहतात. शुक्रवारी पाटील आणि त्यांच्या घरातील सर्वजण खोनीगावातील नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. त्यांच्या घरी कोणीच नव्हते. लग्न सोहळा आटोपल्यावर पाटील घरी आले. त्यावेळी तळमजल्यावरील बेडरुमचा दरवाजा उघडला असता आतमधील लाकडी कपाट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बेडरुममधील आणि कपाटातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या त्यांनी पाहिल्या.
पाटील यांनी सर्वत्र पाहिल्यानंतर लक्षात आले की, बेडरुमची खिडकी उघडी असून खिडकीचे लोखंडी गज वाकलेले होते. कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड गायब झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घरातून 43 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला असल्याची तक्रार पाटील यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. यामध्ये 10 लाख रुपयांची रोकड असून 33 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
या घरफोडीबाबत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल असून पोलीस चोरांचा तपास करत आहेत.
दरम्यान या चोरीच्या एक दिवस आधी भिवंडीतील प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन मंदिरातील 5 दानपेट्या फोडून दानपेटीतील 10 ते 12 लाख रुपयांची रोकड पळवली असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली आहे.