मुंबई : भाजप नेते जयभगवान गोयल यांनी लिहिलेल्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन वादंग उठलं असताना, आता भाजपनं या प्रकरणी हात झटकले आहेत. कारण या पुस्तकाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं भाजपच्या मीडिया सेलचे सहसमन्वयक संजय मयूख यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. मात्र, भाजप नेत्यांनी लिहिलेल्या, भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाच्याच कार्यालयात प्रकाशित झालेल्या पुस्तकाशी संबंध नसल्याची भूमिका भाजप कशी काय घेऊ शकतं, असा सवाल आता विचारला जात आहे.


'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या शीर्षकावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. याबाबत भाजपाने सावध भूमिका घेत पक्षाचा या पुस्तकाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर जयभगवान गोयल यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. गोयलांच्या पुस्तकात पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करण्यात आल्यानं वादंग निर्माण झाला आहे. हे पुस्तक माध्यमांच्या हाती लागणार नाही, याची देखील काळजी घेतली जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.


तर, पुस्तक मागे घेऊ -
पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ, असं लेखक जयभगवान गोयल यांनी म्हटलं आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचं गोयल यांनी सांगितलं. तसंच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, मी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी पुस्तकातील मजकूर माझ्या वैयक्तिक भावना आहेत. भारत लोकशाही राष्ट्र आहे. प्रत्येकाला आपल्या भावना मांडण्याचा अधिकार असल्याचेही ते म्हणाले.

मोदींना शिवाजी महाराजांच्या रुपात पाहतो!
"मोदींच्या येण्यामुळे जगभरात भारताचा गौरव वाढला आहे. यापूर्वी आपला देश धर्मशाळा बनला होता. आता सीएए लागू झालं आहे. आज मोदींनी त्यांना सन्मान दिला, नागरिकत्व दिलं. जसे शिवाजी महाराज निर्णय घ्यायचे, तसे निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या माझ्या भावना आहेत. मी मोदींना शिवाजी महाराजांच्या रुपात पाहतो. माझ्या या भावनांमुळे दुसऱ्या कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.

संबंधित बातम्या - 

NCP Protest Pune | पंतप्रधानांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने राष्ट्रवादीचं पुस्तकाविरोधात आंदोलन | ABP Majha