मुंबई : बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. काल (29 ऑक्टोबर) बेस्ट समितीची बैठक झाली. या बैठकीत बोनस जाहीर करताना बेस्टचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. 2020-21 च्या या अर्थसंकल्पात दोन हजार 249 कोटींहून जास्त अंदाजित तूट दाखविण्यात आली आहे. परंतु, या अर्थसंकल्पात कोणतीही नवीन भाडेवाढ सुचवली नाही, त्यामुळे मुंबईकरांचा किमान पाच रुपयांतील प्रवास सुलभपणे सुरू राहणार आहे.


बेस्टच्या नव्या अर्थसंकल्पात प्रवासी भाड्यामध्ये वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु बेस्टचा नवा अर्थसंकल्प हाती आला असून त्यामध्ये कोणतीही अंदाजित भाडेवाढ नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

2020-21 च्या बेस्टच्या अर्थसंकल्पात तुटीचा आकडा 2,249 कोटी 74 लाख रुपयांवर पोहोचला आहे. बेस्टकडून परिवहन आणि विद्युत असे दोन विभाग चालवले जातात. या अर्थसंकल्पात परिवहन विभागाचे उत्पन्न 1,495 कोटी रुपये इतके नमूद केले आहे. तर एकूण खर्च 3,845 कोटी रुपये इतका दाखवला आहे. विद्युत पुरवठा विभागाचे उत्पन्न 4,063 कोटी रुपये, तर एकूण खर्च 3,963 कोटी दाखवला आला आहे.

बेस्टच्या या अर्थसंकल्पात परिवहन विभागाची तूट 2,349 कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे. तर विद्युत विभागाला 99 कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे.