ठाणे : ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे. सी. आर. सामाजिक नावाच्या संघटनेकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरद्वारे छोटा राजनला वाढदिवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


या बॅनरवर शुभेच्छा देणाऱ्यांचेही फोटो झळकले आहेत. हत्या, खंडणी यांसह अनेक गुन्हे छोटा राजनवर दाखल असून सध्या तो तिहार जेलमध्ये शिक्षा भोगतोय. त्यामुळे हा बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.

13 जानेवारी रोजी छोटा राजनचा (राजेंद्र सदाशिव निकाळजे) वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात झळकल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. शुभेच्छुक प्रकाश भालचंद्र शेलटकर (अध्यक्ष ठाणे शहर ), संगीताताई शिंदे (ठाणे शहर महिला अध्यक्ष ), राजाभाऊ गोळे (मुंबई शहर अध्यक्ष) त्याचबरोबर अॅड. हेमचंद्र उर्फ दादा मोरे (संस्थापक-अध्यक्ष)यांची नावं बॅनरवर आहेत.

एका वरिष्ठ पत्रकाराच्या (जे. डे) हत्येप्रकरणी तसेच खंडणी, धमकावणे अशा अनेक गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांत छोटा राजन फरार होता. तो इंडोनेशियात लपून बसला होता. पोलिसांनी तिथेच त्याच्या मुसक्या आवळल्या. तो सध्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगतोय.