नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारे पुस्तक आज प्रकाशित झाले. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाण्यात भावना दुखावल्याची तक्रार केली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारं एक पुस्तक दिल्ली भाजपच्या कार्यालयात नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्तकाचं नाव आहे.

तक्रारीत म्हटलं आहे की, दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी काल 11 जानेवारी रोजी दिल्ली भाजप कार्यालयात एक पुस्तक प्रकाशित केले असून, त्याचे शिर्षक ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ असे आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज हे कोट्यवधी शिवप्रेमींचे आराध्य दैवत असून, त्यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य कोणाशीही करणे हा आमच्या भावनांचा अवमान आहे.

पुढं म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती एकत्र करून सर्वसामान्य जनतेवरील अन्याय, दडपशाहीविरोधात संघर्ष पुकारला होता. आज मात्र या देशात सामाजिक विद्वेष निर्माण करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय आणि दडपशाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हा त्यांच्या विचारधारेचा आणि कार्याचा मोठा अवमान आहे. त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल, प्रकाशक तसेच विमोचक यांच्याविरूद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि या पुस्तकावर बंदी घालण्यासंदर्भात पावले उचलावीत, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.



दिल्ली भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. काल (12 जानेवारी) भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिल्लीमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर एका धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.

या पुस्तकाद्वारे मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात आल्याने त्याबद्दल राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही तुलना न पटणारी आहे, अशा पद्धतीचे ट्विट केले आहे. 'जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. असेही त्यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनीही अशा पद्धतीने तुलना करपन भाजपने छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याची टीका केली आहे.