मुंबईः पक्ष्यांना दाणे टाकणं किंवा घराभोवती पक्ष्यांचा वावर वाढवताना शेजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे विविध आजार होऊ शकतात हे सिद्ध झालं आहे, त्यामुळे पक्ष्यांचा वावर वाढवताना काळजी घेण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
वरळी येथील प्राणी अधिकार कार्यकर्त्याने बालकनीत प्राण्यांना दाणे टाकण्यासाठी ट्रे ठेवला होता. याविरोधात शेजाऱ्यांकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिका निकाली काढताना कोर्टाने ट्रे हटवण्याचे आदेश दिले.
पक्ष्यांच्या विष्ठेमुळे होतात आजार
बालकनीत पक्ष्यांसाठी ट्रे ठेवल्यामुळे जिगीशा ठाकूर यांच्याविरोधात शेजाऱ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पक्ष्यांवर प्रेम करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र शेजाऱ्यांना ते उपद्रवकारक ठरु शकतं, असं कोर्टाने सांगितलं.
पक्ष्यांच्या आहाराची सोय करणं चांगली गोष्ट आहे. मात्र शेजाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी निर्जनस्थळी पक्ष्यांना आहार द्यावा, असं कोर्टाने सुचवलं आहे. पक्ष्यांच्या विष्ठेमुळे अस्वच्छता तर वाढतेच शिवाय अस्थमा आणि दम्याचे आजारही वाढत असल्याचं तक्रारीमध्ये म्हटलं होतं.