भिवंडी : कोणत्याही व्यक्तीच्या कागदपत्रांद्वारे कर्ज घेऊन दुचाकी वाहने परस्पर ओएलएक्स (OLX) वर विकणाऱ्या टोळीचा भिवंडी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार जणांच्या टोळीला जेरबंद करून 26 दुचाकी जप्त केल्या आहेत.


ही टोळी परिचितांना फसवून त्यांच्याकडून कागदपत्रे मिळवत होती. या कागदपत्रांद्वारे मिळवलेल्या कर्जावर (ईएमआय) दुचाकी खरेदी करत होते. ही दुचाकी परस्पर ओएलएक्स (OLX)अॅपवर विकत होते. या टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 16 लाख रुपये किंमतीच्या तब्बल 26 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

भिवंडी शहरातील एका व्यक्तीस ओएलएक्स (OLX)या विक्री संदर्भातील अॅप वर दुचाकी विक्रीची जाहिरात दिसली. त्याने त्या संबंधिताशी मोबाईलद्वारे संपर्क साधून दुचाकी ही बँकेचे कर्ज न फेडल्याने खेचल्याचे सांगितले आणि 35 हजार रुपयांमध्ये खरेदीचा व्यवहार केला.

35 हजारांपैकी 28 हजार रुपये दुचाकी विकणाऱ्यास दिल्यावर 7 हजार रुपये वाहन नोंदणी नावावर झाल्यानंतर देण्याचे ठरले. परंतु ते काम सात दिवसात होईल, असे सांगितले. परंतु त्यानंतर गाडी विकणाऱ्याने वाहन नावावर केले नाही. त्यामुळे पैसे देणाऱ्याने संबधितास संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या इसमाचा फोन बंद होता. आपले 28 हजार रुपये बुडाल्याचे त्याच्या लक्षात आले.

काही दिवसांनी त्या व्यक्तीने पुन्हा एकदा ओएलएक्सवर त्याच गाडीची जाहिरात पाहिली. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आपली फसवणूक करणारा आणि गाडीची जाहिरात अपलोड करणारा इसम एकच असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्या व्यक्तीने शहर पोलिसांशी संपर्क साधून संबंधित इसमाविरोधात तत्काळ तक्रार केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता यामध्ये मोठी टोळी असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम बारक्या कंपाऊंड येथे राहणाऱ्या सरफराज अब्दुल रेहमान शेख याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली. चौकशीनंतर पोलिसांनी सरफराजच्या टोळीतील सदस्य आरिफ सिराज अन्सारी, अनवर अमिन शेख, मजीद मुनीर अहमद शेख, या तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून 16 लाख रुपयांच्या 26 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.