मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल देशमुखांना अखेर खासगी रूग्णालयात उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. हृदय विकारानं त्रस्त असलेल्या देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यास सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे. अनिल देशमुख यांना नुकतंच ईडीने केलेल्या कारवाई प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 


अनिल देशमुख यांनी आपल्याला अँजिओग्राफीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावं अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी घेताना मुंबई सत्र न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. 


अनिल देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात असून त्यांना 4 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईत हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण त्यांच्यावर सीबीआयनेही गुन्हा दाखल केल्याने अद्याप या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला नाही. जोपर्यंत सीबीआयकडून त्यांना जामीन मिळत नाही तोपर्यंत त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही, म्हणूनच सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन मंजूर करावा यासाठी अनिल देशमुखांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.


ईडीने त्यांना ज्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे त्याच प्रकरणाची सीबीआयकडूनही चौकशी सुरु आहे. त्यामुळे सीबीआय न्यायालयानेही आपल्याला जामीन द्यावा, अशी मागणी अनिल देशमुखांनी आपल्या जामीन अर्जातून केली आहे. त्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने सीबीआयला अर्जावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर देशमुख यांना आपलं गृहमंत्रीपद सोडावं लागलं होतं. हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याच एफआयआरवर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी देशमुखांवर ईसीआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून देशमुख सुमारे वर्षभर मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच आहेत.