मुंबई : मुंबईतील बी वाय एल नायर रुग्णालयाच्या लेबर रुम मंगळवारी (21 जुलै) सकाळी 10 वाजून 4 मिनिटांनी नवजात बाळाच्या आवाजाने दणाणून गेला आणि त्याचवेळी गायनाकॉलिस्टच्या टीमने एकच जल्लोष केला. या जल्लोषामागे महत्त्वाचं कारण होतं. हे कारण म्हणजे मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीच्या यशस्वी प्रसुतीचा 500 वा टप्पा पार केला. एवढ्या मोठ्या संख्येने सुखरुप प्रसुती होणारं हे एकमेव केंद्र असल्याचं नायर रुग्णालयाने म्हटलं आहे.


मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या लाखांच्या पार पोहोचली आहे. सध्या मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचं चित्र आहे. या सगळ्यात दिलासादायक आणि कौतुकास्पद बाब मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातून समोर आली. नायर रुग्णालयात आतापर्यंत 500 कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींची यशस्वी प्रसुती करण्यात आली. प्रसुती विभागातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा हा परिणाम आहे. विशेष म्हणजे या महिलांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला आहे.


नायर रुग्णालयाती 14 एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 723 गर्भवती महिलांवर उपचार केले. त्यामधील 656 मातांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 500 कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसुती करण्यात आली. तर 191 सिझेरियन प्रसुती झाली. त्यांनी 503 निगेटिव्ह बाळांना जन्म दिला. यामध्ये एक तिळे आणि आठ जुळ्या बाळांचा समावेश आहे. आधी काही बालकं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यांची चाचणी केल्यानंतर ही दिवसांनी त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.


रुग्णालयात रुग्ण आणण्यापासून ते मातेची यशस्वी प्रसुती होऊपर्यंतचं सर्व काम प्रसुती विभागातीली डॉक्टर आणि कर्मचारी करतात. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या कामगिरीची दखल आंततराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आंतरराष्ट्रीय फेडरेशनच्या जर्नलमध्ये याबाबत लेख प्रकाशित होणार आहे, अशी माहिती नायर रुग्णालयातील प्रसुती विभागाचे कोविड-19 नोडल अधिकारी डॉ. नीरज महाजन यांनी दिली.


मुंबई सेंट्रल इथे असलेलं नायर रुग्णालय एप्रिल महिन्याच्या मध्यात पूर्णत: कोविड सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आलं. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने अनेक खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम बंद झाले. त्यामुळे गर्भवतींना सरकारी आणि महापालिका रुग्णालयांशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर नायर रुग्णालयातील प्रसुती विभाग हा पूर्णत: कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींच्या प्रसुतीसाठी तयार करण्यात आला.


याशिवाय महापालिकेच्या सायन रुग्णालयातही कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती मातांची प्रसुती होत आहे. आतापर्यंत 300 गर्भवतींची यशस्वी प्रसुती झाली आहे. त्यापैकी 11 बालकं सुरुवातीला पॉझिटिव्ह होती. पण नंतरच्या चाचण्यांनंतर या बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि त्यांना घरी सोडण्यात आलं, असं सायन रुग्णालयाच्या प्रसुती विभागाचे प्रमुख डॉ. अरुण नायक यांनी सांगितलं.


Nair Hospital | नायर रुग्णालयातील 500 कोरोना बाधित मातांची कोरोनामुक्त प्रसूती; जागतिक स्तरावर दखल