क्रिकेटचा सामना सुरु असताना मैदानात धुळीचं वावटळ
एबीपी माझा वेब टीम | 27 Feb 2018 08:43 PM (IST)
हे वावटळ सुमारे अर्धा किलोमीटर उंच होतं, तर त्याचा वेगही जबरदस्त होता.
भिवंडी : मैदानात क्रिकेटचा सामना सुरु असतानाच अचानक महाकाय वावटळ अवतरलं. त्यामुळे क्रिकेटपटूंसह प्रेक्षकांचीही धावपळ उडाली. भिवंडीतील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वातावरणात झालेल्या बदलामुळे भिवंडीतील ग्रामीण भागासह शहरी भागातही लहान-मोठी वावटळं उठत आहेत. भिवंडीतील स्वर्गीय परशुराम टावरे क्रीडांगणात आठवड्याभरापासून बाली स्पोर्ट्स क्लबतर्फे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास सामना सुरु असतानाच अचानक महाकाय वावटळ मैदानात आलं. हे वावटळ सुमारे अर्धा किलोमीटर उंच होतं, तर त्याचा वेगही जबरदस्त होता. प्रेक्षकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करुन तो व्हिडिओ सोशल मिडीयावर 'वावटळा'सारखा व्हायरल केला. क्रिकेटच्या मैदानातून महाकाय वावटळ गेल्यावर त्याठिकाणी धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. अखेर आयोजकांनी मैदानावर पाणी मारलं, प्रेक्षक गॅलरीही पाण्याने साफ केल्यानंतर तब्बल अर्धा ते पाऊण तासाने पुन्हा सामना सुरु झाला. पाहा व्हिडिओ