मुंबई : कमला मिल अग्नितांडवावरुनही विधानसभेत आज पुन्हा मुख्यमंत्री आणि जयंत पाटील आमनेसामने आले. कमला मिलची जागा आघाडी सरकारच्या काळात मिल मालकाच्या घशात घालण्यात आली, त्यामुळे कमला मिल प्रकरण हे मागच्या सरकारचं पाप आहे, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी आपलं निवेदन सादर केलं.


मुख्यमंत्र्यांच्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील चांगलेच संतापले. कमला मिलला आग का लागली, कोणामुळे लागली, त्यांना सरकार पाठीशी घालतंय का हेही मुख्यमंत्र्यांनी तपासावं अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

कमला मिल प्रकरणावर आज विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. कमला मिलमध्ये 1999 च्या पॉलिसीनुसार मिल बंद पडल्यानंतर 40 टक्के म्हाडा, 30 टक्के महानगरपालिका आणि उर्वरित मिल मालक अशी तरतूद होती. मात्र आघाडी सरकारच्या काळात 2001 साली संपूर्ण मिलची जागा मिल मालकांच्या घशात घालण्याचा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे कमला मिल प्रकरण हे मागच्या सरकारचं पाप आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

आयटी पॉलिसीनुसार मिल मालकांना अधिक FSI का देण्यात आला याची चौकशी केली जाईल. तसंच 34 वॉर्ड ऑफिसने फायर कंपलाईन्स होते की नाही हे तपासण्यासाठी आता यंत्रणा उभी करण्यात आली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील सर्व अवैध बांधकाम तोडण्यात येत आहे, चौकशी समिती याचा पूर्ण तपास करणार असल्याचंही मुख्यंमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री आणि जयंत पाटील यांची विधानसभेत जुगलबंदी

दरम्यान गिरणी कामगारांची जागा मागच्या सरकारने खाऊन टाकली, पण आम्ही नियमात बदल करुन म्हाडा, बीएमसीला जागा देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच त्याठिकाणी गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोणाची कुठे, कधी आणि कशी चौकशी करावी, ते करण्याचा मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र मूळ आग का लागली, कोणामुळे लागली, त्यांना पाठीशी घालण्यापेक्षा नको तो इतिहास मुख्यमंत्री काढत बसले असा पलटवार जयंत पाटील यांनी केला. तसंच आम्ही कुठल्याही चौकशीला घाबरत नसल्याचंही स्पष्ट केलं.

मात्र मी चौकशीबाबत बोलल्यावर तुम्हाला एवढी आग का लागली असा खडा सवालच मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांना विचारला. तसंच जे सत्य आहे ते मी बोलणारच, मला सत्य बोलण्यापासून कोणी रोखू शकत नाही अशी पुस्तीही जोडली.