भिवंडी :  भिवंडी शहरात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. इदगाह, दर्गारोड, भुसारमोहल्ला ,
कल्याणनाका, गोपालनगर, पद्मानगर, बंदर मोहल्ला, नदीनाका ,खाडीपार, अंजुरफाटा यांसह तालुक्यातील असंख्य भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.


नदी काठी असलेल्या झोपडपट्टीतील सुमारे 1500 घरांमध्ये कामवारी नदीचे पाणी शिरल्याने तेथील सुमारे 40 ते 50 हजार नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.  नागरिकांचे हाल सुरु असताना भिवंडी महानगरपालिका प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा मात्र कुचकामी ठरल्याचे दिसून आले. इदगाहवर आपत्कालीन परीस्थिती निर्माण झाली असताना तिथे कोणतीही मदत नागरिकांना मिळत नसल्याने नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

वाशिंदचा रेल्वेखालचा बोगदा पाण्याखाली, 42 गावांचा संपर्क तुटला
कल्याण–कसारा मार्गावरील वाशिंद येथे रेल्वेखालील बोगदा पाण्याखाली गेल्याने वाशिंदसह परिसरातील तब्बल 42 गावांचा संपर्क तुटला आहे. गेरसे, कोसला, काकारपाडा, पलसोली, शेरे, अंबरजे, उशीद, हाल, फळेगाव, दहागाव, खातीवली, वासिंद, भातसई अशी यांसह 42 गावांचा संपर्क तुटला आहे.  रेल्वेच्या बोगद्यातील पावसाचे पाणी ओसरण्यासाठी किमान 4 ते 5तास लागणार असल्याचे बोलले जात आहे.



कल्याण –कसारा मार्गावरील वाशिंद पूर्व व वाशिंद पश्चिम यांना जोडणारा बोगदा 42 गावातील गावकऱ्यांना शहराशी जोडणारा एकमेव पर्याय रस्ता आहे. मात्र गेली 23 वर्षांपासून वाशिंदच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने 42 गावांच्या गावकऱ्यांना या रेल्वेच्या बोगद्यातून शहराच्या ठिकाणी ये जा करावी लागते.  वाशिंद येथे उड्डाणपुल होत असून त्याला मंजुरी देखील मिळाली आहे. परंतु मंदगतीने काम सुरू असल्याने बोगद्यातून प्रवास करावा लागत आहे आणि परिसरातील 42 गावातील गावकऱ्यांनी रेल्वे पूल लवकरात लवकर उभारावा यासाठी मागणी होत आहे.