भिवंडी : अवघ्या 25 दिवसांपूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या बाळंतीणीची हत्या करण्यात आली आहे. भिवंडीत राहणाऱ्या 21 वर्षीय सपना राजकुमार गौतम या विवाहितेचा प्रियकरानेच जीव घेतला. आरोपी विकास चौरसियाच्या मुसक्या आवळण्यात शांतीनगर पोलिसांना यश आलं असून अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.


भिवंडीतील भादवड भागातील चाळीत राहणारी सपना आणि तिचा पती राजकुमार गौतम हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशचे. प्रेम विवाह झाल्यानंतर मोलमजुरीसाठी राजकुमार पत्नीसह मुंबईत आला. गेल्या दोन वर्षांपासून हे दाम्पत्य भिवंडीत राहत होतं.

सोबत काम करणाऱ्या आरोपी विकास चौरसियासोबत राजकुमारची मैत्री झाली. त्यामुळे राजकुमारच्या घरी विकासचं येणं-जाणं सुरु होतं. या काळात विकास आणि सपना यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. सपना गरोदर असतानाही  त्यांच्यात शारीरिक संबंध असल्याचं म्हटलं जातं.

सपनाची प्रसुती झाल्यानंतर 4 फेब्रुवारीला पती घरात नसताना सपनाने विकासला घरी बोलावलं. त्यावेळी विकासने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याचा तगादा लावला. मात्र सपनाने नकार दिल्यामुळे विकासने घरातील चाकूने तिच्या मानेजवळ खुपसून तिची हत्या केली. रक्ताचे डाग पुसून तो फरार झाला.

बाळाच्या रडण्याच्या आवाजाने शेजारी राहणाऱ्या महिलेने घरात जाऊन पाहिलं असता सपना बेशुद्धावस्थेत दिसली. पती राजकुमारला बोलावून तिला स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र ती मयत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

सुरुवातीला पत्नीने आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पतीने वर्तवल्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्याबाबत शक्यता पडताळून पाहण्यासाठी मृतदेहाची तपासणी केली असता शवविच्छेदनात तिची हत्या झाल्याचं वैद्यकीय तज्ञांनी स्पष्ट केलं.

शांतीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलिस निरीक्षक राजेंद्र मायने, पोलिस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे यांच्या पथकाने पती राजकुमार आणि परिसरात कसून चौकशी केली असता विकास चौरासियाचं नाव समोर आलं.

माग काढत विकासला ताब्यात घेतल्यावर त्याने सपनाची हत्या आपण केल्याचं तपासादरम्यान कबूल केलं. याप्रकरणी त्याला भिवंडी न्यायालयात हजर  केलं असता आरोपीला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.