भिवंडी : दोन चेंडूत चार धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या खेळाडूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र विजयाचा आनंद साजरा करत असतानाच षटकार मारणाऱ्या या क्रिकेटपटूवर काळाने झडप घातली. संजय ठाकरे (वय 45 वर्षे रा.अंबाडी) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना भिवंडी तालुक्यातील अंबाडी इथे घडली आहे. 


याबाबत मिळालेली माहिती अशी की, भिवंडी तालुक्यातील अंबाडी इथले माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गोविंद ठाकरे हे उत्कृष्ट क्रिकेटपटूही होते. रविवारी (19 जून) 45 वर्षांवरील खेळाडूंसाठी 45 प्लस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील घोटगाव इथे करण्यात आलं होतं. या टूर्नामेंटमध्ये संजय ठाकरे हे गुड मॉर्निंग संघातर्फे खेळण्यासाठी गेले होते. हा सामना अतिशय अटीतटीचा झाला. गुड मॉर्निंग या संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात शेवटच्या 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती. त्यावेळी खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या संजय ठाकरे यांनी उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. 


परंतु हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. विजयाचा आनंद साजरा करत घरी निघालेल्या संजय ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ अंबाडी इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी त्यांचे सहकारी खेळाडू घेऊन गेले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रुग्णालयात दाखल करण्याआधीच संजय ठाकरे यांना मृत्युने गाठले होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


संजय ठाकरे हे भिवंडी तालुक्यातील अंबाडी या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतीचे अनेक वर्षे सदस्य म्हणून कार्यरत होते. तर उत्कृष्ट क्रिकेटपटू असणारे संजय ठाकरे हे सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून परिसरावर शोककळा पसरली आहे.


आठवडाभरापूर्वी पुणे आणि नाशिकमध्येही क्रिकेट खेळताना मृत्यू
आठवडाभरापूर्वी पुणे आणि नाशिकमध्येही अशाच प्रकारच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. पुण्यात क्रिकेट खेळत असताना अचानक दम लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. हडपसर परिसरातील हांडेवाडी इथल्या मैदानावर 12 जून रोजी ही घटना घडली. श्रीतेज सचिन घुले असं या मृत्यूमुखी पडलेल्या 22 वर्षीय मुलाचं नाव आहे.


तर 12 जून रोजी नाशिकच्या इंदिरानगर परिसरात आयोजित क्रिकेट स्पर्धेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या एका ज्येष्ठ खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सुरेश करवा असं या खेळाडूचं नाव आहे. मैदानात फलंदाजीसाठी उभे असलेले सुरेश करवा अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या