भिवंडी : भिवंडीच्या माणकोलीमधील सागर कॉम्प्लेक्समधील गोदामांना बुधवारी सकाळी दहा वाजता लागलेली आग अजूनही विझलेली नाही. या आगीत 16 गोदामं भस्म झाली आहेत. मात्र एकीकडे आगीचं संकट कायम असताना, गोदामाची संपू्र्ण इमारतच कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
आगीमुळे या इमारतीला ठिकठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत. शिवाय इमारतीचे पिलर्सही कोलमडले आहेत. त्यामुळे आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच ही इमारत स्वतःहून पाडली, तर दुर्घटना टाळता येऊ शकते, असं म्हटलं जात आहे.
पाणी नसल्याने भिवंडीतील आग विझवण्यासाठी दोन दिवस लागणार!
सागर कॉम्प्लेक्समधील बी १ या इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली. या आगीत इथली 16 गोदामं जळून खाक झाली असून आग अजूनही विझलेली नाही. ठाणे, कल्याण-डोंबवली आणि भिवंडीतील अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आग विझवण्यासाठी दोन दिवस
धक्कादायक म्हणजे पाणीच उपलब्ध नसल्याने आग विझवण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. आगीच्या ठिकाणापासून पाण्याच्या टाक्या 8 ते 9 किमी लांब असून, नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅफिकमुळे पाणी घेऊन जाण्यास उशीर होत आहे, असं कारण अग्निशमन विभागाने दिलं आहे.
भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग
भिवंडी अग्निशमनदलाची दूरवस्था
भिवंडी अग्निशमनदलात फक्त चार फायर इंजिन आहेत. त्यापैकी तीन फायर इंजिन 12 वर्ष जुने आहेत तर नवीन फायर इंजिन दोन वर्षांपूर्वी खरेदी केली आहे. धक्कादायक म्हणजे इथे एकही वॉटर टँकर नाही, त्यामुळे खासगी पाण्याचं टँकर मागवावं लागतं. अग्निशमन दलात एकही अत्याधुनिक गाडी नाही, त्यामुळे आग विझावतान नेहमी ठाणे, कल्याण एमआयडीसीमधून गाड्या आणल्या जातात. यासोबतच फायरमन आणि अधिकाऱ्यांचीही कमतरता आहे. भिवंडीमध्ये महिन्यातून कमीत कमी सहा वेळा मोठी आग लागते, त्यात औद्योगिक वसाहत असल्याने जास्त गरज असूनही महापालिकेचं याकडे दुर्लक्ष आहे.