भिवंडी : भिवंडीच्या माणकोलीमधील सागर कंपाऊंडमधील गोदामांना बुधवारी सकाळी दहा वाजता लागलेली आग अजूनही विझलेली नाही. या आगीत 16 गोदामं भस्म झाली आहेत.


ठाणे, कल्याण-डोंबवली आणि भिवंडीतील अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

धक्कादायक म्हणजे पाणीच उपलब्ध नसल्याने आग विझवण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. आगीच्या ठिकाणापासून पाण्याच्या टाक्या 8 ते 9 किमी लांब असून, नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅफिकमुळे पाणी घेऊन जाण्यास उशीर होत आहे, असं कारण अग्निशमन विभागाने दिलं आहे.

भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग

मात्र दोन दिवस आग अशीच धुमसत राहिली तर मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होण्याची शक्यता आहे. ही आग एवढी मोठी आहे की, आगीचे लोट मुंबई-नाशिक महामार्गापर्यंत पोहोचले आहेत.

त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झालेला दिसत आहे. सध्या वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची ही गोदामं आहे. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सुदैवाने आगीत जीवितहानी झालेली नाही. गोदामातूनन 50 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.