ठाणे : ठाण्यात पारसिक बोगद्याजवळ घसरलेला मालगाडीचा डबा हटवण्यात आला आहे, पाच तासांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लोकल ट्रेन्स जवळपास 20 मिनिटं उशिराने धावत आहेत.


मध्य रेल्वेवरील तब्बल 60 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या, तर 100 ते 150 लोकल उशिराने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वे रखडल्यामुळे घरी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. मध्य रेल्वेवरील अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली.

ट्रेन येण्यास विलंब होत असल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. बराच वेळ लोकल नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. खूप वेळाने आलेली लोकल गर्दीने भरुन येत असल्यामुळे त्यात चढायला जागा नाही. त्यामुळे घरी जाण्याच्या वेळी प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागलं.

ठाण्यात मध्य रेल्वेवर मालगाडीचा डबा घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. दिवा स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरुन रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.



दिवा स्टेशन आणि पारसिक बोगद्याच्या दरम्यान मालगाडीचा डबा घसरला. त्यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणारी फास्ट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठाणे-नवी मुंबई ट्रान्सहार्बर जवळ मुकुंद कंपनी ते भोलानगर मार्गावर (ठाणे महापालिका वॉर्ड 54 आणि नवी मुंबई महापालिका वॉर्ड 1) च्या वेशीवर मालगाडीचा डबा घसरला होता.