Bhiwandi Building Collaps: भिवंडीच्या (Bhiwandi) वळगावातील वर्धमान कंपाउंडमध्ये तीन मजली इमारत कोसळली (Building Collaps). या दुर्घटनेत आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी एनडीआरएफसह टीडीआरएफच्या जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आज जवळपास 20 तासानंतर एका व्यक्तीला ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात NDRF ला यश आलं आहे. विशेष म्हणजे, या व्यक्तीचा आज वाढदिवस असल्याचंही बोललं जात आहे. 


एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांनी सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या सुनील पिसाळ या इसमाला एनडीआरएफच्या जवानांनी तब्बल वीस तासानंतर जिवंत बाहेर काढलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सुनील पिसाळ याचा आज वाढदिवस आहे. एनडीआरएफच्या जवानांनी त्याला वाढदिवसाच्या दिवशी नवं जीवनदान दिल्यानं त्यांनी एनडीआरएफचे जवान आणि अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. 


पाहा व्हिडीओ : Bhiwandi Building Collapsed : इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबलेल्या 10 लोकांना NDRF ने वाचवलं



तब्बल 20 तास ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज... 


भिवंडी तालुक्यातील वळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तीन मजली इमारत शुक्रवारी दुपारी एक वाजल्याच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत 22 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.  त्यापैकी आतापर्यत 14 जणांना बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांनी यश  आहे. तर या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 10 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वीस तास उलटूनही घटनास्थळी मदत आणि शोध कार्य सुरू असून गोदामात हमालीचे काम करणाऱ्या सुनील पिसाळ याला आज सकाळी वीस तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आलं आहे.


सुनील हा भिवंडी शहरातील फुलेनगरमध्ये राहत असून त्याच्या कुटुंबात आजारी वडील, एक मोठा भाऊ आणि तीन बहिणी आहेत. घराची संपूर्ण जबाबदारी सुनील आणि त्याचा मोठा भाऊ यांच्या खांद्यावर होती. सुनील आणि त्याच्या मोठा भावानं अथक प्रयत्न करून मेहनत करून तिन्ही बहिणींचं लग्न केलं आणि गेल्या डिसेंबर 2022 मध्ये मोठ्या भावाचा तर जानेवारी 2023 मध्ये सुनिल पिसाळचं लग्न झालं. विशेष म्हणजे, सुनील पिसाळची पत्नी गरोदर आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील गोदामात हमालीचं काम करत होता. 


दुर्घटना घडली त्यादिवशीही नेहमीप्रमाणे तो गोदामात काम करत असतानाच अचानक इमारत पडत असल्याचं त्याला जाणवलं. त्यानंतर तातडीनं जीव वाचविण्यासाठी तो गोदामातील जाड काचेच्या भेगेत जाऊन बसला. त्याच्या अंगावर मलबा पडून तो अडकून पडला त्याच्या अंगावर 20 फुटाची भिंत होती. 20 तास अन्न पाण्याविना तो बचावासाठी बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होता. मात्र त्याला ते जमलं नाही. आज मात्र सकाळी NDRF चे पथक काम करत असताना त्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे तो जिवंत असल्याचं समजताच त्याच्यासाठी रात्रभर जागून काढलेल्या नातेवाईक आणि मित्रांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कारण त्याचा आज वाढदिवस होता. त्याला ज्यावेळी ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलं त्यानं सर्वात आधी  NDRF जवानांना हात जोडले. 


दरम्यान, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 7 ते 8 व्यक्ती अडकल्याची माहिती मिळत असून शोधकार्य केले जात आहे. विशेष म्हणजे, 20 तासांनंतर जखमी, जिवंत व्यक्ती बाहेर काढलेल्या सुनीलचा वाढदिवस आजच असल्यानं त्याला वाढदिवशी जीवनदान मिळाल्याची प्रतिक्रिया NDRF कमांडर दीपक तिवारी यांनी दिली आहे. तर ढिगाऱ्याखालून  जोपर्यंत शेवटचा व्यक्ती बाहेर निघत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शोध मोहीम सुरू ठेवणार असून अडकलेल्या व्यक्तीला जिवंत कसा काढता येईल यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न राहणार असल्याचे एनडीआरएफचे कमांडर दीपक तिवारी यांनी सांगितलं आहे.


एनडीआरएफच्या जवानांनी त्यांना बाहेर काढताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. सर्वांनी सुनील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच सुनील यांना त्यांना मिळालेल्या जीवनदानासाठीही शुभेच्छा देण्यात आल्या. सुनील यांनी हा जोडून एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले. सुनील यांची वाट पाहत रात्रभर त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय त्यांच्या सुखरुप बचावासाठी प्रार्थना करत उभे होते. अखेर सुनील सुखरुप बचावल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावले आणि त्यांनीही एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले. 


मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत


वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.