Bhiwandi Building Collaps: भिवंडी तालुक्यातील वलपाडा परिसरात वर्धमान इमारत अचानक कोसळल्याची घटना काल (शनिवारी) दुपारी घडली होती. घटनास्थळी अद्याप बचावकार्य सुरू आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली 22 जण अडकले असून आत्तापर्यंत 14 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यापैकी दहा जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांच्या बचावासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. 


भिवंडीतील वर्धमान कंपाउंडमधील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काही लोक इमारतीच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचं गोडाऊन होतं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या बनवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये भाडेतत्वावर नागरिक राहत होते.  


मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत


वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.


एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांनी सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या सुनील पिसाळ या इसमाला एनडीआरएफच्या जवानांनी तब्बल वीस तासानंतर जिवंत बाहेर काढलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सुनील पिसाळ याचा आज वाढदिवस आहे. एनडीआरएफच्या जवानांनी त्याला वाढदिवसाच्या दिवशी नवं जीवनदान दिल्यानं त्यांनी एनडीआरएफचे जवान आणि अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले आहेत. 


तब्बल 20 तास ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज... 


सुनील पिसाळ वीस तास या इमारतीच्या ढिगाराखाली होते. एका 20 फुटांच्या भिंतीखाली ते अडकले होते. आपल्या बचावासाठी सुनील यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांनी अनेकदा आवाजही दिले पण त्यांची हाक कोणालाच ऐकू येत नव्हती. अखेर त्यांनी अपेक्षाच सोडून दिली होती. पण, अशातच आशेचा किरण दिलसा. एनडीआरएफच्या जवानांचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यानंतर सुनील यांनी आपल्या बचावासाठी जवानांना जोरजोरात आवाज देण्यास सुरुवात केली. तब्बल 20 तास सुरू असलेल्या या बचाव कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी सुनील पिसाळ यांना सुखरुप बाहेर काढलं. 


एनडीआरएफच्या जवानांनी त्यांना बाहेर काढताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. सर्वांनी सुनील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच सुनील यांना त्यांना मिळालेल्या जीवनदानासाठीही शुभेच्छा देण्यात आल्या. सुनील यांनी हा जोडून एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले. सुनील यांची वाट पाहत रात्रभर त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय त्यांच्या सुखरुप बचावासाठी प्रार्थना करत उभे होते. अखेर सुनील सुखरुप बचावल्यानंतर सर्वांचे डोळे पाणावले आणि त्यांनीही एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले.