नवी मुंबई : मराठीच्या मुद्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. तमिळसह संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिआ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मग मराठीला का नाही? असा सवाल करत आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत. नवी मुंबई मनसेच्या वतीने ही पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहेत. मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करुन आता साडेचार वर्ष उलटली आहेत.
केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यासाठी केंद्र सरकारचे डोळे उघडण्यासाठी मनसेने दिल्ली दरबारी पंतप्रधान कार्यालयाला 10 हजार पोस्ट कार्ड पाठवले जाणार आहेत.
या मोहिमेत मराठी जनतेने सामील होण्याचे आवाहन मनसेने केले आहे. पठारे समितीने आपल्या अहवालात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या संदर्भातील सर्व कागदपत्रे, पुरावे सादर केली आहेत. मात्र तरीही राज्य सरकार केंद्रावर दबाव आणत नाही आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजून केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळेच मनसे पोस्टकार्डच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीने त्यांच्या भावना केंद्र सरकारकडे पोहचविणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.