विविध विषयांवर रंगलेला प्रकाश आंबेडकर यांच्या 'माझा कट्टा'चं प्रक्षेपण आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर होणार आहे.
एमआयएमशी हातमिळवणी करुन वंचित बहुजन आघाडी जन्माला घालणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमविरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर संशय उपस्थित करताना मोदी सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या आंबेडकरांनी, आता चक्क विधानसभेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.
...तर विधानसभा लढवणार नाही!
विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "हे सरकार, निवडणूक आयोग ईव्हीएम वापरण्यात इंटरेस्टेड असेल तर आपण निवडणूक प्रक्रियेतच भाग घेऊ नये. बॅलेट येणार असेल तर आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सहभागी होऊ, ही भूमिका महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. बॅलेट आलंच पाहिजे यावर मी ठाम आहे आणि नाही आलं तर विधानसभा नाही लढणार. आता माझं हे मत आमच्या पक्षात कॅरी होईल का हे मी आता ठामपणे सांगू शकत नाही. पण मी कॅरी करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन."
तसंच बॅलेट पेपरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षासोबत चर्च करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचा हात पकडणार?
लोकसभेत वंचित बहुजन आघाडीने खाल्लेल्या 41 लाख मतांमुळे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नऊ उमेदवारांचा पराभव झाला. मात्र वंचितसोबतच हातमिळवणी करुन विधानसभेतला आमदारांचा आकडा वाढवण्याचं स्वप्न काँग्रेसला पडू लागलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी 'माझा कट्टा'वर आळवलेला सूर पाहता, विधानसभेत वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला टाळी देण्याची शक्यता कमीच आहे.
विधानसभेत कुणाला तारणार, कुणाला मारणार?
सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वंचित बहुजन आघाडी चांगलाच भाव खात आहे. मुस्लीम आणि बहुजनांच्या मतांची गोळाबेरीज करण्यात काही अंशी यशस्वी ठरलेली वंचित आघाडी, विधानसभेत किंगमेकर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त ती कुणाला तारणार आणि कुणाला मारणार हे पाहावं लागेल.