भिवंडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडीमध्ये आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यावेळी काही जोडपी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली. त्यापैकी काही जणांची मुलंही आई-वडिलांच्या डोक्यावर अक्षता टाकायला उपस्थित होती.

खासदार कपिल पाटील फाऊंडेशन आणि हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहापूरमधील तब्बल 1101 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुलवामामध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व आदिवासी जोडप्यांना आशीर्वाद दिले.

या विवाह सोहळ्यात निम्म्याहून अधिक जोडपी अगोदरच विवाहबद्ध झाली होती. त्यातील काही जण तर मुलांना कडेवर घेऊन विवाहमंडपात दाखल झाली होती.

या कार्यक्रमालाा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील उपस्थित होते.

फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपने हा विवाह सोहळा आयोजित केला होता. भाजप समाजसेवाच्या नावाखाली असं चुकीचं वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माझी खासदार सुरेश टावरे यांनी केला.