मुंबई: इंधन दरवाढीविरोधात देशभरात विरोधकांनी एकत्र येत भारत बंदची हाक दिली आहे. शिवसेनेनेही पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन ‘सामना’तून सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दोघेही एकत्र पाहायला मिळाले. दोघांनीही मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. सिद्धिविनायकाच्या चरणी दोघांनी एकत्र माथा टेकला.

भारतीय पोस्ट विभागातर्फे  सिद्धिविनायक मंदिराचा पोस्टल स्टॅम्प तयार करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेऊन, आज त्यांच्या हस्ते या स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले.



यावेळी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह सर्व विश्वस्त, प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल उपस्थित होते.

भारतीय पोस्ट विभागातर्फे ‘माय स्टॅम्प’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीस आपला स्वतःचा, आपल्या परिवाराचा, मित्राचा, नातेवाईकाचा फोटो सिद्धिविनायक मंदिराच्या टपाल तिकिटाच्या अर्ध्या बाजूला प्रिंट करून मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

सामनातून विरोध, पण बंदमध्ये सहभाग नाही

दरम्यान, आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकत्र दिसले असले, तरी सामनातून सरकारवर इंधन दरवाढीवरुन टीकास्त्र सोडण्यात आलं. एकीकडे सर्व विरोधक भारत बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र सत्तेत राहून कायम सरकारविरोधात भूमिका घेणारी शिवसेना आज सत्ताधाऱ्यांसोबत आहे. शिवसेनेनं आजच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. पण त्याला यश आलं नाही. कारण शिवसेनेनं बंदमध्ये सहभागी होऊ नये यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांनी फोन केल्याची माहिती मिळते. दैनिक मिररनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. पण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळं आहे.

यापूर्वी अमित शाहांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. राज्यसभेत उपसभापतीच्या निवडणुकीवेळीही शिवसेनेनं भाजपला साथ दिली आणि आता अमित शाहा आणि मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर बॅकफूटवर आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध फक्त सामनाच्या अग्रलेखापुरता आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.