लोअर परेलमधील ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सिद्धार्थ यांची हत्या केल्याची कबुली चौघांपैकी एकानेच पोलिसांकडे दिली होती. चौघा संशयितांपैकी दोघे जण सिद्धार्थ यांचे सहकारी आहेत, तर एक कॅब चालक आणि एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. 20 वर्षीय कॉन्ट्रॅक्ट किलर रईस उर्फ सर्फराझ शेखने सिद्धार्थ यांचा मृतदेह कल्याणजवळ पुरल्याची माहिती दिली होती.
सिद्धार्थ संघवी यांचं व्यावसायिक यश सहकाऱ्यांना खुपल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या 11 वर्षांत त्यांची झालेली पदोन्नती आणि वेतनवाढ सहकाऱ्यांना सलत होती.
एचडीएफसीच्या लोअर परेल शाखेत सिनिअर एक्झिक्टुटिव्ह म्हणून सिद्धार्थ संघवी क्रेडिट अँड मार्केट रिस्कवर लक्ष ठेवून होते. 2007 मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सिनिअर मॅनेजर) म्हणून सिद्धार्थ संघवी बँकेत रुजू झाले. 2011 मध्ये सहाय्यक उपाध्यक्ष (असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून त्यांची पदोन्नती झालं. 2015 मध्ये संघवींची वर्णी डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंटपदी लागली. 2017 मध्ये संघवी उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) झाले. 11 वर्षांच्या कालावधीत तीन वेळा मिळालेल्या पदोन्नतीमुळे सहकाऱ्यांचा जळफळाट होत होता.
'त्या' रात्री काय झालं?
सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासोबत राहत होते. बुधवारी रात्री ऑफिस सुटल्यानंतर ते लोअर परेलहून मलबार हिलच्या दिशेने निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलंही, मात्र ते घरी न पोहचल्याने कुटुंबीय काळजीत पडले.
सिद्धार्थ संघवींचा फोन बंद होता. रात्रभर वाट पाहून शोधाशोध केल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली. शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात आढळली होती. गाडीत रक्ताचे डागही सापडले होते.