भांडुप (मुंबई) : मुंबईतील भांडुप पोलिसांनी हनी ट्रॅप लावून लोकांना फसवणाऱ्या नायजेरियन जोडप्याला जेरबंद केले आहे. न्नाग्बू ओरायजुका आणि नेहारिका ओरायजुका अशी या जोडप्याची नावं असून, ही दोघे फेसबुकवर सुंदर महिलांच्या नावे प्रोफाईल बनवून त्यात तरुणांना ओढून त्यांना लाखोचा गंडा घालण्यात पटाइत होते.
न्नाग्बू ओरायजुकाने ‘मर्सी जॉन’ नावाने फेसबुकवर एक अकाउंट काढले होते. यावरुन तो लोकांना विशेषत: व्यापारी वर्गला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे. ऑक्टोबर महिन्यात त्याने संदीप सिंग नावाच्या एका शेअरमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या व्यापाऱ्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. या दोघांच्या करस्थानाला बळी पडून संदीप यांनी रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर संदीप यांच्या फसवणुकीला नायजेरीयन जोडप्याने सुरुवात केली.
मर्सी जॉन असल्याचं भासवून न्नाग्बूच्या बायकोने संदीपशी बोलण्यास सुरवात केली. आपण यूकेमधील एका फार्मासिटिकल कंपनीत असल्याचं सांगितले. या हर्बल सीडच्या व्यावसायात खुप पैसे असल्याचं आमिष तिने संदीपला दाखवलं.
पैसे दुप्पट होतील या आशेने संदीप यांनी आधी अडीच लाख रुपये भरुन हर्बल सीड भारतीय सप्लायरकडून विकत घेतले. विशेष म्हणजे या सीड पाहण्यासाठी न्नाग्बू कंपनीचा मालक बनून भारतात आला आणि संदीपला भेटला देखील. त्यानंतर 50 हर्बल सीड पेकेटची ऑर्डर असल्याचं सांगून संदीप सिंगकडून सप्लायरच्या अकाऊंटमध्ये 10 लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून दिलेल्या बँक खात्यावर डिपॉझिट केले.
पैसे मिळताच मर्सी जॉन आणि भारतातील सप्लायर या दोघांचाही नंबर अचानक बंद झाला. त्यानंतर पैसे परत करण्याच्या नावाखाली पुन्हा एक लाख 26 हजरांची मागणी केली.
आपले 12 लाख परत मिळतील या आशेने संदीप यांनी पैसे भरले देखील, पण 12 लाख तर सोडा नंतर गुंतवलेल्या पैशांचादेखील पत्ता नव्हता. आता मात्र संदीप यांना संशय आला आणि त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार केली.
नायजेरियन जोडपं दिल्लीतून आपली कारस्थानं करत असल्याचं लक्षात आल्यानंतर भांडुप पोलिसांची टीम दिल्लीला रवाना झाली. पण दिलेल्या पत्त्यावर हे जोडपं न भेटल्याने पोलिसांनी गुड फ्रायडेचा मुहूर्त बघून दिल्लीतील एका चर्चवर पाळत ठेवली आणि या दोघांना अटक केली.
पोलिसांनी या दोघांकड़ून 14 मोबाइल, वेगवेगळ्या देशांचे सिम कार्ड, इंटरनेट डोंगल, मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप जप्त केले आहेत.