मुंबई : मुंबईतील भांडुप इथल्या ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी  पोलिसांच्या हाती अग्निशमन दलाची काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. ज्यामुळे मॉलचे प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.  भांडुप पोलिसांकडून करण्यात असलेल्या तपासात धक्कादायक वळण समोर आल आहे. आग लागण्याच्या चार महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने ड्रीम मॉलचं फायर इन्स्पेक्शन करुन प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांना नोव्हेंबर 2020 मध्ये नोटीस बजावली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ड्रीम मॉलमध्ये 25 मार्च रोजी आग लागली होती. यामध्ये 11 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


मुंबई अग्निशमन दलाच्या नोटीसनुसार फायर इन्स्पेक्शनच्या वेळी मॉलमधील फिक्स फायर फायटिंग सिस्टम कार्यरतच नव्हती. मॉलच्या बेसमेंट आणि शेडवर काही भंगार होते. आग लागल्यावर ती विझवण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणंही कार्यरत नव्हती. 2020 मध्ये दिलेल्या नोटीसद्वारे या सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याची सूचना अग्निशमन दलाने दिली होती.


आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई फायर ब्रिगेडने स्पष्ट सांगितलं होतं की दिलेल्या सूचनांचं जर पालन केलं नाही तर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, ज्यामध्ये तीन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडचा समावेश आहे. मात्र तरी देखील अग्निशमन दलाने दिलेल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले.


आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने दिलेल्या आपल्या अहवालात सुद्धा आग विझवण्यासाठी मॉलमधील त्रुटी नमूद केल्या आहेत. दुकान क्रमांक 140 मध्ये आग लागली आणि ही आग पसरत वरपर्यंत गेली. आगीचं मुख्य कारण डिफेक्टिव्ह इलेक्ट्रिक सर्किट सांगण्यात आलं आहे. तसंच मॉलमध्ये करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम सुद्धा आग लागण्यास जबाबदार असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे, ज्यामुळे मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रुग्णालयात विषारी धूर पसरला आणि 11 निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला.


फायर डायरेक्टर प्रभात रहंगदळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला असून महापालिका आयुक्तांनी यास मंजुरी दिली आहे. भांडुप पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाचा फेरा वाढण्याची शक्यता आहे तसेच लवकरच दुकान क्रमांक 140 चे मालक आणि मॉल प्रशासक यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.


तर दुसरीकडे आपल्या अडचणीत होत असलेली वाढ पाहून राहुल सहस्रबुद्धे यांनी पोलिसांची चौकशी आणि अटकेची शक्यता पाहता कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी 7 जून 2021 सुनावणी होणार आहे.