मुंबई : राज्याच्या कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय यांना कृषी खात्यातून अखेर हद्दपार करण्यात आले आहे. सहाय यांना पुन्हा कृषी खात्यात रुजू करण्याचा निर्णय सरकारने रद्द केला आहे. मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारकडून सहाय यांच्या संदर्भातील आदेश बदलला आहे.
कृषी खात्यात अप्पर मुख्य सचिव पदावर असताना, भगवान सहाय यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांना 12 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
भगवान सहाय रजेवर असतानाच, सरकारकडून आदेश काढण्यात आला होता. ज्यामध्ये ते पुन्हा आधीच्याच पदावर म्हणजेच कृषी खात्याचे अप्पर मुख्य सचिव म्हणूनच रुजू होतील, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी या आदेशाचा निषेध करत काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. त्यानंतर राज्य सरकारने आता आदेश बदलला आहे.
दरम्यान, नव्या आदेशामध्ये भगवान सहाय सुट्टीनंतर नक्की कोणत्या पदावर रुजू होतील, याबाबत उल्लेख नाही. त्यामुळे सरकार सहाय यांनी कोणत्या पदावर रुजू करतं, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.