मुंबई : मुंबईत तुम्ही जर तुमच्यासोबत काही मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम घेऊन जात असाल तर काळजी घ्या, कारण मुंबईत सध्या जादूगार गँगने धुमाकूळ घातला आहे. काही कळायच्या आतच ही गँग तुमच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करते. ह्या गँगचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुंबईच्या रेल्वे क्राईम ब्रान्च पोलिसांनी अशाच एका गँगचा पर्दाफाश केला आहे. पण शहरात ही गँग अजूनही सक्रिय आहे.
या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन रस्त्यावरुन जात आहे. पण अचानक या व्यक्तीच्या जवळपास काही जण फिरताना दिसतात. हातात दागिन्यांची बॅग घेऊन जाणारा इसम जादूगार गँगचा शिकारी आहे.
जादूगार गँगमधील दोघांच्या हातात बॅग आहे, तर एकाच्या हातात पिशवी. बॅगवाल्या दोघांनी आपल्या बॅगेच्या सहाय्याने त्या माणसाच्या मागे आडोसा तयार केला. त्याचवेळी रिकाम्या हाती असणाऱ्या तिसऱ्या साथीदाराने त्या माणसाच्या हातातली सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली आणि पिशवी असलेल्या साथीदाराच्या हातात दिली. अवघ्या 5 सेकंदात त्या माणसाच्या हातून 30 तोळे सोन्यांची बॅग लंपास झाली
रेल्वे पोलिसांनी सचिन कुंचीकर्वे उर्फ सत्या, निखील पप्पू देवाल उर्फ नवाब, महमद आदम उर्फ बटला, जबीर अली सय्यद या चार आरोपींना अटक केली आहे.
या गँगने 3 ऑगस्टला मालाडमध्ये अशाचप्रकारे एका व्यक्तीच्या हातातून 12 लाख रुपयांची रोकड पळवली आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 20 हजारांची रोकड जस्त केली आहे.
मुंबई रेल्वे पोलिसांच्या क्राईम ब्रान्चचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष धनवटे यांच्या माहितीनुसार, "जादूगार गँगमध्ये 8 ते 10 सदस्य असतात, जे पापणी मिटण्याआधीच एखाद्याच्या हातातील वस्तू गायब करतात. पोलिसांपासून सावध राहण्यासाठी ते एकमेकांशी बोलताना कोडवर्डचा वापर करतात. यांच्या भाषेत शिकाराचा अर्थ 'धूर'. या गँगचं वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रुपमध्ये चालतात पण कोणालाही कसलाही संशय येत नाही. चालणाऱ्या सामान्य माणसाला असंच वाटतं की, त्याच्या शेजारी चालणारे लोक त्याच्यासारखेच सामान्य आहेत. पण संधी मिळताच त्याच्या हातात वस्तू घेऊन आपल्या साथीदारांकडे सोपवतात आणि सगळे आपापल्या रस्त्याने चालायला लागतात.
या जादूगार गँगने केवळ मुंबईच्या दिंडोशी, एलटी मार्ग, वांद्रे आणि बोरीवलीमध्येच नाही तर जयपूर, बंगळुरु आणि लखनौमध्ये आपलं जाळं पसरवलं आहे. मालाड, बोरीवली आणि एल टी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ह्या गँगचे अनेक सदस्य फरार आहेत.
जादूगार गँगपासून सावधान, पापणी मिटण्यापूर्वीच ऐवज लंपास करतात!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2017 04:08 PM (IST)
या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हातात सोन्याच्या दागिन्यांची पिशवी घेऊन रस्त्यावरुन जात आहे. पण अचानक या व्यक्तीच्या जवळपास काही जण फिरताना दिसतात. हातात दागिन्यांची बॅग घेऊन जाणारा इसम जादूगार गँगचा शिकारी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -