मुंबई : 22 जूनपासून सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. कारण 22 जूनपर्यंत थकीत पगार खात्यावर जमा न झाल्यास  बेस्टचे 36 हजार कर्मचारी संपवार जातील, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनने दिला आहे.


बेस्ट कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार 2 तारखेपर्यंत मिळणे अपेक्षित होतं. मात्र, आता प्रशासनाने 20 तारखेला अर्धा पगार देण्याचं आश्वासन दिलं आहे. उरलेला अर्धा पगार कधी मिळणार या बद्दल आश्वासन मिळालेलं नाही. त्यामुळे 20 ते 22 जून या दरम्यान पूर्ण पगार खात्यावर जमा झाला नाही, तर 22 जूनपासून संपावर जाणार असल्याचा बेस्ट वर्कर्स युनियनने इशारा दिला आहे.

“औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन बेस्ट प्रशासनाने बेस्ट कामगारांना 20 जून 2017 रोजी केवळ अर्धा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट प्रशासनाची ही कृती बेस्ट कामगारांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.”, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटले आहे.