बेस्ट संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत, पण मुंबईकरांचे हाल करण्याची इच्छा कोणत्याही कर्मचाऱ्याची नाही. इतका अन्याय होऊनही कर्मचाऱ्यांनी कधी संप पुकारला नाही. आता मुंबईकरांनीही या कर्मचाऱ्यांना साथ द्यायला हवी, असे आवाहन देखील देशपांडे यांनी केले आहे.
वडाळा डेपोत बेस्ट कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर देशपांडे म्हणाले की, संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत पण तुमच्या मनात मुंबईकरांचे हाल व्हावे अशी इच्छा नाही. इतका अन्याय होऊनही तुम्ही संप पुकारला नाही, आता मुंबईकरांनी बेस्टचा विचार करावा. आम्हाला मुंबईकरांना वेठीस धरायचे नाही, पण प्रशासन कामगारांना वेठीस धरणार असेल तर आमचा नाइलाज आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने आम्हाला वेठीस धरु नये, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आम्हाला घाबरवू नये, स्वत:च्या पायावर बाहेर पडायचे असेल तर आमच्या वाट्याला जाऊ नका, असा इशाराच त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. बेस्ट कर्मचाऱ्यांना घर खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी हा इशारा दिला. सोमवारपर्यंत तोडगा निघाला नाही तर सोमवारी मुंबईतील रस्त्यांवर तमाशाच होईल आणि यासाठी जबाबदारी प्रशासन व सत्ताधाऱ्यांची असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
फेसबुक पोस्टद्वारे शिवसेनेवर टीका
देशपांडे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबईकरांचे आणखी दोन दिवस हाल, बेस्टचा संप लांबण्याची शक्यता
बेस्टचा संप आता आणखी दोन दिवस लांबण्याची शक्यता आहे. आज मंत्रालयात उच्च स्तरीय समितीसोबत बेस्ट कर्मचारी कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान महापालिका - बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना अशा दोन्ही बाजू उच्च स्तरीय समितीने ऐकून घेतल्या. उच्च स्तरीय समितीने कर्मचारी संघटनांकडून लेखी स्वरूपात मागण्या मागवून घेतल्या आहेत. मुख्य सचिव चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील. त्यानंतर उच्च स्तरीय समिती अहवाल सोमवारी कोर्टासमोर सादर करणार आहे. या कोर्टात मांडलेल्या अहवालावर कोर्ट काय निर्णय देईल यावर बेस्ट संपाचं भवितव्य अवलंबून असणार आहे..
बेस्ट कर्मचारी संपाचा पाचवा दिवस
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज पाचव्या दिवशीही सुरुच आहे. संपाबाबत काल झालेल्या बैठकांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं संप सुरुच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कामगार कृती समितानं घेतला. मात्र मुंबईरांचे हाल होऊ नये यासाठी स्कूल बस संघटना आणि मुंबई बस मालक संघटना धावून आली आहे. जवळपास दोन हजार खासगी बसेस मुंबईकरांच्या सेवेसाठी आज रस्त्यावर धावणार आहेत.
बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांपासून बेस्टची एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड गैरसोईला सामोरं जावं लागत आहे. मुंबईकरांचा त्रास कमी व्हावा यासाठी स्कूल बस संघटना आणि मुंबई बस मालक संघटना यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही संघटना मुंबईकरांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी जवळपास दोन हजार बसेस रस्त्यावर उतरवणार आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
- 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
- अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी
संबंधित बातम्या
संपाचा मुंबईकरांना फटका, बेस्ट भाडेवाढीचा प्रस्ताव
बेस्ट कर्मचारी संपावर चौथ्या दिवशीही तोडगा नाहीच
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंची शिष्टाई अपयशी
बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका, उद्या सुनावणी
बेस्टचा संप : तिसऱ्या दिवशीही बस रस्त्यावर नाही, बत्तीही गुल होणार?
बेस्ट संप चिघळला, कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात