मुंबई : बेस्टचं किमान भाडं 5 रुपये झाल्यानंतर बेस्टच्या तिजोरीत सुट्या पैशांचा सुळसुळाट झाला आहे. हे सुट्टे पैसे बंदे करण्यासाठी बेस्टने 'बंदे पैसे द्या आणि सुट्टे घेऊन जा' अशी ऑफर सुरु केली आहे.

बेस्टच्या परिवहन विभागाच्या बस तिकिटाचे सुसूत्रीकरण नुकतेच करण्यात आले आहे. बेस्ट बसमधून प्रवास करताना सुटे पैसे न दिल्यास प्रवासी आणि वाहकांचे वादही होतात.

प्रवाशाकडे सुट्टे पैसे नसल्यास तिकीटीच्या मागे उर्वरित पैसे वडाळा डेपोत जाऊन घ्या, असे लिहून देत प्रवाशाला पिडले जाते. यावर उपाय म्हणून बेस्टनेच त्यांच्या तिजोरीत जमा झालेली लाखो रुपयांची चिल्लर कोणतेही जादा दर, कमिशन न आकारता प्रवासी, व्यापारी, नागरिक, टोलनाके यांना देण्यासाठी काढली आहे.

यासाठी प्रत्येक बेस्ट आगारातील रोखे आणि तिकीट विभागात कामकाजाच्या दिवशी 9.30 ते 3.30 दरम्यान जाऊन तुम्ही बंदे पैसे सुट्टे करुन घेऊ शकता.

बेस्टकडे दररोजच्या उत्पन्नातून तब्बल 10-12 लाख रुपयांची 1,2,5,10 रुपयांची नाणी जमा झाली आहेत. ती नाणी कोणीतरी घ्यावी आणि त्या बदल्यात बेस्टला 100, 500 आणि दोन हजार रुपयांच्या मोठ्या वजनदार नोटा द्याव्यात. याचाच अर्थ 'कोणी चिल्लर घेता का चिल्लर' असे उघड आवाहन मुंबईकरांना करण्यात आले आहे.

बेस्ट बसच्या ताफ्यात सध्या तीन हजार 193 बसेस आहेत. त्यापैकी रस्त्यावर धावणाऱ्या 80% बसगाड्यांमधून 33 लाख प्रवासी प्रवास करतात. तिकीट दर कपातीनंतर प्रवाशांनी बेस्ट बसला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. मात्र किमान तिकीट पाच रुपये केल्याने प्रवासी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा वाहकाला देतात. बेस्ट उपक्रम त्यांच्या वाहकांना दररोज बस प्रवाशांना देण्यासाठी फक्त 100 रुपयांची नाणी (1,2 आणि 5 रुपयांची नाणी) देते. वाहकाने दिवसभर त्याच सुट्ट्या 100 रुपयांचा वापर करून दिवसभर बेस्टला तिकीट भाडे वसूल करून द्यायचे.

बेस्टकडे लाखो रुपयांची चिल्लर असूनही ती त्यांनी व्यापारी व नागरिकांना देण्यापेक्षा आपल्या बस वाहकाला दररोज वापरण्यासाठी दिल्यास वाहक व प्रवासी यांच्यात दररोज निर्माण होणारा वाद संपुष्टात येण्यास मदत होईल. मात्र बेस्टने ही चिल्लर वाहकांजवळ देण्याऐवजी बंदे रुपये घेऊन येणाऱ्या प्रवाशांनाच देण्याचं ठरवलं आहे.