मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपातून शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने माघार घेतली आहे. त्यामुळे दिवसभर हाल सोसलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवसभर बेस्ट संपावर कोणताही तोडगा न निघाल्याने नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
बेस्ट प्रशासनासोबत चर्चा करुन संपावर तोडगा काढू असं बेस्ट कामगार सेनेनं म्हटलं होतं. मात्र अखेर बेस्ट कामगार सेनेची संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे
बेस्ट कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी आज मध्यरात्रीपासून कामावर रुजू होणार आहे. फर्स्ट शिफ्टमधील 500 बसेस पहाटे बाहेर पडणार आहे. मात्र बेस्ट कृती समितीनं संप सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आवश्यकता भासल्यास पोलीस सुरक्षा देऊन बस चालवणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
बेस्टचा संप, टॅक्सीचालकांची मुजोरी
बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत टॅक्सीचालकांची मुजोरी पाहायला मिळत आहेत. टॅक्सीचालक प्रवाशांकडून चौपट दर वसूल करत आहेत. मीटर किंवा शेअर टॅक्सीच्या दरांऐवजी प्रतिप्रवासी भाडे आकारणी करुन मुंबईकरांची पिळवणूक सुरु आहे. भायखळा ते जेजे ब्रीज या एक ते दीड किमी अंतरासाठी तब्बल 80 रुपये भाडं आकारलं जात आहे. शिवाय खाजगी बसही जादा पैसे प्रवाशांकडून घेत आहेत. त्यामुळे अनेकजण जवळच्या प्रवासासाठी लिफ्ट घेऊन प्रवास करत आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
- 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
- अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी