मुंबई : यंदाच्या दिवाळीत बेस्ट कर्मचाऱ्यांची निराशाच होण्याची शक्यता आहे. कारण बेस्ट कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळी बोनस मिळणार का, याविषयी शंका उपस्थित होत आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी जवळपास 25 ते 30 कोटी रुपये खर्च होतो, मात्र आधीच बेस्टला 70 कोटी रुपयांचा तोटा असल्याने बोनस देणं बेस्टला कितपत परवडेल यात शंका आहे.
गेल्या वर्षी बेस्ट कर्मचाऱ्यांना साडे पाच हजारांचा बोनस देण्यात आला होता, मात्र दिवाळीनंतर तो त्यांच्याच पगारातून वसूल करण्यात आला. महापालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी पैसे द्यावेत अशीही मागणी जोर धरत आहे.
महापालिकेचं कर्ज फेडण्यासाठी बेस्टने इतर बँकांकडून इतकं कर्ज घेतलं आहे, की ते फेडणं आता बेस्टच्या गळ्याशी आलं आहे. बेस्टने महापालिकेकडून घेतलेलं 1600 कोटींचं कर्ज फेडण्यासाठी बेस्ट महामंडळाने इतर बँकांकडून कोट्यावधीने कर्ज उचलली.
नोव्हेंबरमध्ये बेस्टला 20 कोटी 29 हजारांचा शेवटचा हप्ता फेडायचा आहे. मात्र बँकांकडून घेतलेल्या कर्जामुळे आज बेस्टवर एकूण दोन हजार कोटींच्या कर्जाचा बोजा आला आहे. त्यात बेस्ट सातत्याने तोट्यात जात असल्याने हे कर्ज फेडायचं कसं, हाच यक्षप्रश्न उभा राहिला आहे.