मुंबई : ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप होता. मध्यरात्रीपासून बेस्टचे जवळपास 35 हजार कामगार संपावर जाणार होते.


औद्योगिक न्यायालयाने बेस्ट कामगार कृती समितीस संप न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘बेस्ट’मध्ये खासगी गाड्या सुरु करण्याबाबत बेस्ट कामगार संघटनांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी झाली. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत बेस्टमध्ये खासगी गाड्या चालवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करता येणार नाही.

येत्या 5 मार्चपर्यंत याची अंतीम सुनावणी होईल. त्यामुळे 5 मार्चपर्यंत बेस्ट कामगार कृती समिती संप करणार नाही.

बेस्टला खासगीकरणाकडे नेणाऱ्या या निर्णयाला शशांक राव यांच्या बेस्ट युनियन समितीनं विरोध केला आहे. हळूहळू बेस्ट संपवण्याचा घाट घातला जातोय असं संघटनेचं म्हणणं आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे पगार आणि दिलेल्या दिवाळी बोनसचे हप्ते त्यांच्याकडूनच वसूल करत प्रशासनानं बेस्ट कामगारांना वेठीस धरलं जात आहे. असं या संघटनांचं म्हणणं आहे.