मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर आपल्या कुंचल्यातून निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवरुन हे व्यंगचित्र शेअर केले आहे.


‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तर तीन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील.’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे.

व्यंगचित्रात काय दाखवलंय?

व्यंगचित्रात सरसंघचालक मोहन भागवत झोपले आहेत आणि त्यांना स्वप्न पडलं आहे. 'थंडीतील एक उबदार स्वप्न!' असे या स्वप्नाला राज ठाकरेंनी नाव दिले आहे.



मोहन भागवत आणि 'नवसंघिष्ट' काठ्या घेऊन उभे आहेत आणि त्यांच्यासमोर 'संघ विचार', 'बौद्धिक', 'चिंतन' अशा पुस्तकांचा ढीग आहे. भागवत पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेक्याला उद्देशून म्हणातात, "क्या है रे इकडे? चलो पलिकडे! दांडुका दैखा नही क्या हमारा? एक एक को पुस्तक फेकके मारेगा! समजलं क्या?" त्यावेळी पळणारे पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेकी म्हणतात, "भागोsss! भागवत आया!"

एकंदरीत राज ठाकरेंच्या कुंचल्याची धार दिवसेंदिवस तीक्ष्ण होत जाते आहे. मोदी, शाह, उद्धव ठाकरे, जातीयवाद अशा विविध विषयांवरील व्यंगचित्र आतापर्यंत राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केले आहेत.

आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरच राज ठाकरेंच्या कुंचल्याने निशाणा साधल्याने, संघ परिवार आणि भाजपमधून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.