मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना उद्या 22 जूनला पूर्ण पगार देण्याचे बेस्ट प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलं आहे. 22 जूनला बेस्ट कामगार संघटनांनी पगार न मिळाल्याप्रकरणी संपाची हाक दिली होती.
गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जात नाही. त्यामुळे मे महिन्याच्या थकलेल्या पगारापैकी अर्धा पगार 19 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यानंतर उर्वरित पगारासाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी 22 जूनला संपाचं हत्यार उपसलं होतं. याच पार्श्वभूमीवर 22 जूनला पूर्ण पगार देणार असल्याचं आश्वासन आज बुधवारी देण्यात आलं.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा मे महिन्याचा पगार 2 तारखेपर्यंत मिळणे अपेक्षित होतं. मात्र प्रशासनाने 19 तारखेला अर्धा पगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. उरलेला अर्धा पगार कधी मिळणार या बद्दल आश्वासन मिळालेलं नव्हतं. त्यामुळे 20 ते 22 जून या दरम्यान पूर्ण पगार खात्यावर जमा झाला नाही, तर 22 जूनपासून संपावर जाणार असल्याचा बेस्ट वर्कर्स युनियनने इशारा दिला होता.
“औद्योगिक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन बेस्ट प्रशासनाने बेस्ट कामगारांना 19 जून 2017 रोजी केवळ अर्धा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्ट प्रशासनाची ही कृती बेस्ट कामगारांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.”, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटले होतं.