मुंबई :  बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. हा संप मिटण्याची आशा धूसर झाली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन देखील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात अपयश आले आहे. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असून उद्या बेस्ट कामगारांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल असे, बेस्ट कर्मचारी संघटनेचे शशांक राव यांनी सांगितले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर स्वतः उद्धव ठाकरे अजाॅय मेहता, सुरेन्द्र बागडे आणि बेस्ट कृती समितीच्या सदस्यांची बैठक बोलावली होती.ही बैठक तब्बल ७ तास चालली. तरीही या बैठकीत कुठलाही  तोडगा निघाला नाही.



बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याला आयुक्तांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप सुरूच राहणार असल्याचे शशांक राव यांनी सांगितले आहे. बाकीच्या मागण्यांवर देखील कुठलेही लेखी आश्वासन दिलेले नाही. बैठकीत चर्चा कुठेलाही तोडगा निघाला नाही. आम्हाला पैसे नाहीत असे सांगितले. 7 तासाहून अधिक तास चाललेली बैठक निष्फळ ठरली असल्याचे राव म्हणाले.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र मार्ग निघाला नाही, असेही ते म्हणाले. सोबतच या संदर्भात आम्ही आधीच मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून मागण्यांवर विचार करून आम्हाला काहीतरी लेखी द्या, अशी मागणी राव यांनी केली.

या बैठकीत आयुक्तांनी बराच वेळ चर्चा केली. मात्र काहीच तोडगा निघाला नाही. हे आंदोलन कामगारांचे आहे. आम्ही कामगारांसमोर काय घेऊन जायचे. कामगारांचे स्पष्ट म्हणणे आहे की, असेही जगणे कठीण आहे. त्रासदायक आहे. त्यामुळे सन्मानजनक तोडगा काढावा अशी कामगारांची भावना आहे, असे राव म्हणाले. उद्या आम्ही कामगारांचा मेळावा घेणार आहोत,  त्यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असेही राव यांनी सांगितले.



बेस्ट संपाविरोधात हायकोर्टात याचिका, उद्या सुनावणी



बेस्ट कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून यामुळे सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे हा संप बेकायदेशीर असून न्यायालयाने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्वरीत रुजू होण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करत अ‍ॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आली आहे. याप्रकरणी हायकोर्टाने बेस्ट प्रशासन, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस धाडत शुक्रवारी सकाळी यावर तातडीची सुनावणी ठेवली आहे.

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्टच्या कर्मचा-यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. या संपात बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी सहभाग घेतला असून गेल्या दोन दिवसांपासून बेस्टच्या सुमारे 3700 बसेस विविध आगारात उभ्या आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात एक समिती स्थापन करावी. अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर करण्यात आली.

कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात
मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्माअंतर्गत नोटीस देण्यास सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर कामावर जायचं नसेल तर बेस्ट वसाहतीतल्या खोल्या खाली करा, असा आदेशही बेस्ट प्रशासनाने दिला आहे. यामुळे भोईवाडा बेस्ट वसाहतीत बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि बेस्ट प्रशासनात जुंपली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच असल्याने विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांचे आजही हाल होत आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपातून शिवसेनाप्रणित कामगार सेनेनं माघार घेतली. पण, कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्यास नकार दिला. कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी आज कामावर रुजू होणार असल्याचं संघटनेने म्हटलं, पण आज 11 हजारांपैकी फक्त 59 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने काल 500 बेस्ट बस रस्त्यावर उतरण्याची घोषणादेखील फोल ठरली आहे. परिणामी शिवसेनेच्या संघटनेतील बेबनाव समोर आला आहे.

 संपाबाबत नामुष्की झाल्याची शिवसेनेची कबुली
बेस्ट संपाबाबत झालेल्या नामुष्कीची शिवसेनेने कबुली दिली आहे. आदेश देऊनही आमच्या संघटनेतील कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत हे आम्ही मान्य करतो, असं शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष
सुहास सामंत यांनी सांगितलं.

बेस्ट संपातून शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेची माघार

तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: बेस्ट संपात लक्ष घालणार आहे. उद्या दौऱ्यावरुन आल्यावर बेस्ट संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक घेणार आहेत. शिवाय कनिष्ठ कामगार श्रेणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहे. कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांना समान श्रेणी, समान वेतन देण्यात येईल, अशी चर्चा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांच्याशी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे
- 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरु होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी
- एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे
- 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस
- कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा
- अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी