मुंबई: बेस्ट बसेसमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता आता प्रवाशांचा प्रवास तिकीट लेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 'चलो अँप'वरुन वाहकाला पैसे दिल्यास मोबाईलवरच तिकिट दिसणार आहे. तसेच पास दाखवल्यावरही मोबाईलवर तिकीट दिसणार आहे. 'चलो ॲप' ही सुविधा उपलब्ध झाल्यापासून दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी या नवीन प्रणालीला पसंती दिली आहे.


बेस्ट उपक्रमाने 'चलो ॲप' सुरु केले असून हे ॲप सलग्न असलेल्या मोबाईल बॅलेटमधून अथवा कार्डमधून पैसे अदा करुन तिकीट विकत घेता येते. आतापर्यंत हे तिकीट दाखवल्यावर प्रवाशांच्या विनंतीवर वाहक प्रवाशांना पूर्वी प्रमाणे कागदी तिकीट देण्यात येत होते. मात्र, 14 फेब्रुवारीपासून ही पध्दत बंद होणार आहे. ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांना पूर्वी प्रमाणे कागदी तिकीट देणे बंद करण्यात येणार आहे, असे बेस्ट उपक्रमाकडून कळविण्यात आले आहे. या ॲपसोबत पासही जोडलेला असणार आहे. 


या मोबाईल ॲप्लिकेशनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्ट मधून सरासरी 24 लाख हून अधिक प्रवासी रोज प्रवास करत आहेत. त्यातील 5 लाख 25 हजार प्रवाशांनी 'चलो अॅप' डाऊनलोड केले आहे. त्यातील 1 लाख 50 हजार प्रवासी  'चलो अप' आणि स्मार्ट कार्डद्वारे बेस्ट तिकीट पास घेऊन बसमध्ये प्रवास करतात.


मुंबईमध्ये प्रवासासाठी लोकलनंतर सर्वात सोयीची आहे ती बेस्ट बस. आता बेस्टची सेवा आणखी स्मार्ट झाली आहे. बेस्ट प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी चलो अ‍ॅप लॉन्च करण्यात आलं आहे. ज्यामुळे कॅान्टॅक्ट लेस टिकीट आणि बेस्टचं अचूक लोकेशन समजते. सुरुवातीला या अॅपला अल्प प्रतिसाद मिळाला होता. तसेच तांत्रिक अडचणी देखील समोर आल्या होत्या. आता त्यात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. 


'चलो अप' हे या आधी भारतातल्या आग्रा, चेन्नई, भुवनेश्वर, लखनौ, कोलकाता, हुबळी, कानपूर, पाटणा, बेळगाव अशा 21 शहरात कार्यरत आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha